अकोला: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे, मात्र सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वॉर्डसमोरच वापरण्यात आलेले पीपीई कीट उघड्यावर पडल्याचे आढळून आहे. या प्रकाराकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्या वाढीला सुरुवात झाली. बाजारपेठेत अनेक नागरिक बेफिकरीने वावरताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना फैलावाचा धाेका अधिक वाढला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जाते, मात्र कोरोना वार्डात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ही खबरदारी घेण्यात येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शनिवारी सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वॉर्डासमोर वापरण्यात आलेली पीपीई कीट आणि मास्क उघड्यावरच पडल्याचे आढळून आले. हा प्रकार कोरोनाच्या फैलावास कारणीभूत ठरत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
मास्कची विल्हेवाट नाहीच
सर्वोपचार रुग्णालय परिसरात तसेच शहरातील विविध भागात वापरण्यात आलेले मास्क उघड्यावरच पडून असल्याचे निदर्शनास येते. हाच प्रकार खासगी रुग्णालय परिसरातही दिसून येतो.