खामगाव: गणेशोत्सवानंतर अनंत चतुदश्रीला विसर्जीत झालेल्या गणेश मूर्ती आणि निर्माल्यांची विल्हेवाट लावताना नगर पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विसर्जीत गणेश मूर्ती आणि निर्माल्याला नगर पालिका प्रशासन चक्क कचर्यासारखीच वागणूक देत असल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत उघडकीस आले. स्वच्छतेच्या नावावर दोन दिवसांपूर्वी विहिरीत निर्माल्य आणि अर्धवट मूर्ती जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आल्या. या मूर्ती आणि निर्माल्य एका ट्रकद्वारे ' कचरा' म्हणून फेकून देण्यात आले. पालिकेच्या या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील मोठय़ा मूर्तीसह, काही घरगुती गणेश मूर्तींचेही विसर्जन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील मोठय़ा विहिरीत करण्यात येते. विविध देवी देवतांच्या मूर्तीसह अनेक महिला भाविक या विहिरीत नियमित निर्माल्यांचे विसर्जन करतात. शहरात देवी-देवतांच्या मूर्ती विसर्जनाची दुसरी पर्यायी जागा नाही. त्यामुळे या विहिरीतच निर्माल्य आणि मूर्तींचे विसर्जन केल्या जाते. दरम्यान, स्वच्छतेच्या नावावर शुक्रवारी नगर पालिका प्रशासनाकडून अर्धवट जिरलेल्या गणेश मूर्ती आणि काही निर्माल्य जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. एका ट्रकद्वारे हे निर्माल्य रावणटेकडी परिसरातील खुल्या जागेवर फेकून देण्यात आले. या ठिकाणीच नगर पालिका प्रशासनाकडून शहरातील इतर कचरा फेकल्या जातो. या कचर्यावरच निर्माल्य आणि अर्धवट मूर्ती फेकण्यात आल्यामुळे शहरातील गणेशभक्त आणि नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड चिड व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने निर्माल्या सारख्या वस्तूंची व्यवस्थित विल्हेवाट लावायला हवी होती.** शहरात कचर्याचे जागोजागी ढिग !शहरात जागोजागी कचर्याचे ढिग साचले आहेत. या कचर्यांबाबत वारंवार ओरड करूनही नगर पालिका प्रशासनाकडून दखल घेतल्या जात नाही. या कचर्याबाबत तक्रार निवेदनही नागरिकांनी सादर केली आहेत. मात्र, हा कचरा साफ केल्या जात नाही. याऊलट गणेशोत्सवाला दोन-तीन महिन्यांचा कालावधी असतानाही विहिर स्वच्छ करण्याचे औचित्य काय? असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.
खामगाव नगर पालिका स्वच्छता विभागाचा प्रताप
By admin | Published: July 12, 2014 10:27 PM