नीलेश जोशी, बुलढाणा: सलग चारवेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम करणारे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. दरम्यान सायंकाळी ते शपथ घेणार आहेत.बाजार समितीमधील अडत व्यापारी ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा आजवरच राजकीय प्रवास रहाला. मेहकर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार तथा राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये क्रीडा व युवक कल्याण तसेच पाटबंधारे राज्यमंत्री (लाभ व विकास) खाते सांभाळत त्यांनी जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढविण्यावर भर दिला होता.
दरम्यान आता केंद्रीय मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली असून जिल्ह्यात शिंदेसेनेच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. पंतप्रधान कार्यालयातून त्यांना दुरध्वनी गेल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली आहे.
बुलढाण्याला केंद्रात तिसऱ्यांदा बहुमान
बुलडाणा जिल्ह्याला खा. प्रतापराव जाधव यांच्या रुपाने तिसऱ्यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळाले आहे. यापूर्वी सर्वप्रथम मुकूल वासनिक हे १९९० च्या दशकात केंद्रामध्ये क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री बनले होते. त्यानंतर २००२ मध्ये केंद्रातील एनडीएच्या सरकारमध्ये एकसंघ शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे केंद्रीय अर्थराज्यमंत्री बनले होते. त्यानंतर आता प्रतापराव जाधवांच्या रुपाने जिल्ह्याला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळण्याचा तिसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे.
दोन महत्त्वपूर्ण समित्यांवरही कार्य
गेल्या पंचवार्षिकमध्ये केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तसेच त्यानंतर केंद्रीय माहिती व संवाद तथा तंत्रज्ञान समितीचेही अध्यक्षपद भुषवत त्यांनी ग्रामविकास आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सुचनाही या दोन्ही समित्यांच्या माध्यमातून केल्या होत्या. त्याचा या दोन्ही क्षेत्रातील धोरण ठरवितांना लाभ झाला आहे.