बुलडाणा : पंचायत राज समिती सदस्य आमदारांच्या पाच चमूंनी मंगळवारी जिल्हा पाहणी केली. पीआरसी येणार म्हणून प्रतीक्षेत असलेल्या शाळा, आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतींमधील कर्मचार्यांनी पीआरसी येताच प्रचंड भीतीच्या दडपणाखाली सदस्यांचे स्वागत केले, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली व तद्नंतर सदस्यांनी अनेक ठिकाणी झाडाझडती घेतली तर कुठे समाधान व्यक्त केल्याने कर्मचार्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.देऊळगावराजा येथील दोन विभागांना संपूर्ण दप्तर घेऊन बुलडाण्यात येण्याचे आदेश दिल्याने या विभागाचे धाबे दणाणले आहे.बुलडाणा जिल्ह्यात पंचायत राज समितीने मंगळवारी पाहणी करून शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत अशा संस्थांची पाहणी केली. या पाहणीत जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथील शाळेत शालेय पोषण आहाराची चव सदस्यांनी घेतली तर मनसगाव येथे आरोग्य केंद्राची झाडाझडती घेतली. बुलडाणा पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागातील कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.पीआरसी पथकाला सिंचन विभाग व एकात्मिक बालविकास केंद्र यांनी सादर केलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळल्याने पीआरसीने दोन्ही विभागाच्या प्रमुखांना बुधवारी बुलडाणा येथे हजर होण्याचे आदेश दिले आहेत. आ.भरतसेठ गोगावले यांच्या नेतृत्वातील सदस्यांनी एकात्मिक बाल विकास सेवा विभागाकडे पूरक पोषण आहारासाठी पात्र मुले किती? ३00 दिवस किती मुलांना आहार वाटप झाला, बंद पडलेल्या काळात पर्यायी व्यवस्था काय केली, २0१0 ते ११ मध्ये किती लाभार्थी होते, प्रकल्पनिहाय किती मुलांना गंभीर स्वरुपाचे आजार होते, आजार असलेल्या व तपासणी केलेल्या मुलांची संख्या किती, त्यापैकी किती जणांना सेवा दिली, तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्या किती आहे, याबाबत प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी केवट यांच्याकडे विचारणा केली असता, या प्रश्नांची सर्मपक उत्तरे त्यांनाही देता आली नसल्याची माहिती आहे. प्रश्नतालिकेतील प्रश्न क्र.२५ सिंचन विभागाशी संबंधित होता. पंचायत राज समितीमध्ये आतापर्यंत मंजूर झालेली लघू पाटबंधारे स्थानिक क्षेत्र विकासांची कामे किती, हा प्रश्न गाजला. तालुक्यातील गोळेगाव येथील शेततलावासह इतरही दोन ते तीन गावांच्या शेततलावासंदर्भात समिती सदस्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी केवट व सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता यांना बुधवारी तातडीने अहवाल घेऊन बुलडाणा येथे हजर राहण्याचे आदेश पीआरसीने दिले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या पथकाने पंचायत समिती लेखा विभाग, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्राम समितीने मागविलेल्या निविदा, प्रलंबित प्रकरणे, मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना, जवाहर रोजगार योजनेची कामे आदी कामांचा आढावा घेतला. यावेळी बीडीओ ज्ञानोबा मोकाटे, पं.स.सभापती अनिता झोटे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी सहभागृहात हजर होते.
‘पीआरसी’ने घेतली झाडाझडती
By admin | Published: January 20, 2016 1:57 AM