सध्या मान्सूनपूर्व कामांचे दिवस असून, अनेक ठिकाणी विजेचे प्रश्न उद्भवत आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी झाडाच्या फांद्यांची छाटणी सुरू केली आहे. १० ते १५ जूनदरम्यान पाऊस दाखल होत असतो. त्यापूर्वी मान्सूनपूर्व पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विजेच्या संदर्भातील कामे पावसापूर्वी मार्गी लावणे गरजेचे झाले आहे. धामणगावसह डोमरूळ, मासरूळ, जनुना, तराडखेड, गुम्मी, टाकळी गावच्या शेतशिवारामध्ये तसेच रोड लगतच्या झाडे झुडपांमध्ये विजेची तार अडकलेल्या दिसून येतात. या तारांना पावसाळ्याच्या दिवसात वारा सुटल्यानंतर झाडाच्या फांद्यांचे वारंवार घर्षण होऊ शकते. परिणामी वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी अशी झाडे व झाडाच्या फांद्या काढणे गरजेचे झाले होते. अशा स्वरूपाची सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण झाली तरच पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहू शकतो, अन्यथा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. वादळासह पाऊस पडल्यावर तारांमध्ये असलेल्या झाडांंतही विजेचा प्रवाह येतो. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी धामणगाव धाड परिसरात विविध कामे पूर्ण केली आहेत. यावेळी महावितरण कर्मचारी जी.एस. वाघ, एस.के. काकडे, शेख इलियास, शेख हसन, संतोष आहेर, के.एस. साळवे हजर होते.
महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:26 AM