संदीप वानखडे, बुलढाणा : शिक्षक द्या, आम्हाला शिक्षक द्या, असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घाेषणांनी बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयाचा परिसर दणाणला. दाेन वर्षांपासून मागणी करूनही शिक्षकांची रिक्त पदे न भरल्याने संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद गाठली. तेथेच शाळा भरवल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आठ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी पालकांनी वारंवार शिक्षण विभागाला निवेदन दिले. ग्रामपंचायतचा ठराव घेऊन थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेटही घेतली. मात्र, शिक्षकांची नियुक्तीच हाेत नसल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन बुधवारी जिल्हा परिषद गाठली.
यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत घेऊन तिथेच शाळा भरवली. या आंदाेलनामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी चाेख बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. मागणी मान्य हाेईपर्यंत आंदाेलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी पालकांनी केला. बसण्यासाठी डेक्स-बेंचच नाहीत माटरगाव बु. येथील जिल्हा परिषद शाळेत परिसरातील ७५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी केवळ अकराच वर्गखाेल्या आहेत, त्यातही डेक्स-बेंच नसल्याने विद्यार्थ्यांना खालीच बसावे लागले. गेल्या चार वर्षांपासून पालकांची शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी आंदाेलने सुरू आहेत. मात्र, त्यांच्या मागणीची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही.