- अशोक इंगळे
साखरखेर्डा: श्री पलसिद्ध महास्वामी यांचा स्मृती सोहळा साखरखेर्डा येथे १८ आॅगस्ट पासून तीन दिवस आयोजित करण्यात आलेला आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यानुषंगाने येथील मठाधीपती म्हणून ४० वर्षापासून कामकाज पाहत असलेले शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्याशी साधलेला संवाद...
श्री पलसिद्ध महास्वामींचे साखरखेर्डा येथे आगमन कसे झाले ?
- कर्नाटकमधील बिदर प्रांताचे राजे जयसिंग यांच्या प्रदेशात दुष्काळ पडला होता. साधु संतांना पाऊस पाडण्यासाठी अधिष्ठानासाठी त्यावेळी बसविण्यात आले. पण पाऊस पडला नाही. त्यामुळे साधु संतांना तुरूंगात डांबण्यात आले होते. त्याची वार्ता जगद्गुरू मरुळसिद्ध शिवाचार्य यांना कळाल्याने त्यांनी दक्षीणेकडे कुच करत बिदर गाठले व अनुष्ठाण सुरू केले. त्याला प्रसन्न होत वरूण राजाने सात दिवस पाऊस पाडला. त्यानंतर कर्नाटकमधील उजैनी येथे पीठ स्थापना करून विरशैव धर्माचा प्रसार भारत भ्रमण करीत त्यांनी खेटकपूर गाठले.
पलसिद्ध नाव कसे रुढ झाले?
- खेटकपूर अभयारण्यात महास्वांनी तपश्चर्या केली. वय वाढल्याने पुढील प्रवास शक्य नव्हता. त्यामुळे मरूळसिद्ध महास्वामींनी एका गुहेत प्रवेश करून पळसाच्या वृक्षाखाली समाधी घेतली. स.न. ९८० मधील तो काळ होता. पळसाच्या वृक्षाखाली ते समाधीस्त झाल्याने मरुळसिद्ध यांचे नावाचे पलसिद्ध महास्वामी म्हणून रुढ झाले. बिदर प्रांतात त्यांना मळी (पाऊस पाडणारे) स्वामी म्हणून ओखळल्या जाते. मठाच्या गादीवर किती महापुरुष होऊन गेले? मठाची स्थापना झाल्यापासून सुमारे ३० स्वामींनी गादीवर बसून मठाचा कारभार पाहिला.सोबतच धर्म प्रसाराचे काम केले. विरशैव धर्म हा पुरातन धर्म आहे. सर्वांशी समन्वय ठेवून जातीभेद विरहीत विरशैव लिंगायत धर्म कार्यरत आहे. विरशैव धर्म कोणत्याही धर्माचा विरोध करत नाही. विरशैव धर्म पुरातन आहे. सर्व धर्मांचा सन्मान आम्ही करतो. साखरखेर्डा गावाचे पूर्वीचे नाव खेटकपूर असे होते. खेटकासूर नावाचा राक्षस येथे वास्तव्याला होता. अशी अख्यायिका आहे. त्यावरून या गावाचे नाव खेटकपूर पडले होते. संस्थांनच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून तसे प्रयत्न सुरू आहेत.
मठाच्या विकासासाठी काही ठोस निर्णय आहेत का?
- मठाचा विकास येथे शैक्षणिक, आरोग्य तथा पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यास होऊ शकतो. त्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. या संस्थांनला आता ब वर्गाचा दर्जा मिळाला असून विकास कामे सुरू आहेत. हा दर्जा मिळाल्यामुळे भक्त निवास, शौचालयांची सुविधा, धार्मिक कार्यासाठी सभागृह, भोजन मंडप, पाकगृह अशी विविध कामे येथे झाली आहे. येथे पर्यटन स्थळ विकसीत झाले तर साखरखेर्डा गावाचा आर्थिक विकास होईल. संस्थांनाला ब वर्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे विकासाची प्रक्रिया सुरू होऊन येथे सुविधा उपलब्ध होत आहेत.