ब्रह्मानंद जाधव, लोणार : नवरात्रोत्सवास १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून, लोणार सरोवरातील कमळजा माता मंदिरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत येथील सरोवरातील कमळजा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी राहणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागाकडून भाविक भक्तांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
विदर्भ-मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सरोवरातील कमळजा मातेच्या दर्शनासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांत भाविकही मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. लोणार वन्यजीव अभयारण्यातील घनदाट वनराईत कमळजा मातेचे हेमाडपंती मंदिर आहे. कमळजा माता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कमळजा देवी मंदिरासमोरच सासू-सुनेची विहीर असून, विहिरीतील जलपातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे ही विहीर पूर्णतः पाण्यात बुडलेली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त कमळजा मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी वन्यजीव विभागाच्या वतीने विशेष नियमावली जारी केली आहे. दर्शनासाठी सरोवरात प्रवेश करणाऱ्या भाविकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वन्यजीव अभयारण्य लोणारच्या वतीने करण्यात आले आहे. लोणार सरोवरातील कमळजा माता देवीचे मंदिर हे जवळपास एक हजार वर्षे जुने आहे.
भाविकांनो दर्शनाला जाताय, काळजी घ्या...
कमळजा मातेचे मंदिर सरोवराच्या काठावर अभयारण्य क्षेत्रात असल्याने या जंगलातून पायी चालतच जावे लागते. या क्षेत्रात बिबट्यासह राणडुक्कर, रोही, कोल्हे, तडस या सारख्या हिंस्र प्राण्यांचा तसेच विषारी सापांचे सुद्धा मुक्त वावर असतो. यामुळे भाविकांनी सकाळी ६ वाजेनंतरच सूर्यप्रकाश असताना दर्शनासाठी जावे, तेही गटागटाने जावे. नवरात्र उत्सवात भविकांनी वनविभागाने नेमून दिलेल्या पायवाट रस्त्याचाच वापर करावा, सोबत कुठल्याही प्रकारच्या प्लास्टिक कॅरीबॅग नेऊ नये, नोंदणी करूनच सरोवरात प्रवेश करावा. लहान मुले, स्त्रिया, वृद्ध व्यक्तींनी आपल्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेणाऱ्या व्यक्तीसोबतच दर्शनासाठी जावे, जाताना-येताना आरडा-ओरड करू नये, वन्यप्राण्यांना किंवा पक्षांना त्रास होईल, असे वर्तन करू नये, असे आवाहन वनविभाग आणि वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी वन्यजीव विभागाच्या वतीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करूनच भाविकांनी कमळजा माता दर्शनासाठी यावे. -चेतन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग.