लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोणताही पक्ष हा निवडणुकीसाठी केव्हाही तयार असतो. आम्हीही निवडणुकीसाठी चोवीस तास तयार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या विधवांना खा. सुप्रिया सुळे यांच्यावतीने मदत करण्यात येते. सध्या मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात येत आहे. आता विदर्भातील शेतकर्यांच्या कुटुंबीयांनाही मदत करण्यात येणार असून, याची सुरुवात बुलडाण्यातून झाली आहे. जिल्हय़ातील आत्महत्याग्रस्त विधवांची मदत देण्यासाठी निवड करण्याकरिता खा. सुप्रिया सुळे बुलडाण्यात आल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, की जिल्हय़ातील २५ आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांची निवड करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्याकरिता मदत करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्चही आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. त्यामध्ये कोणत्याही अटी नकोत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. रुईखेड मायंबा येथे एका महिलेवर अत्याचार झाला असून, ही पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी घटना असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेकडे जातीपातीच्या दृष्टीने न पाहता केवळ एका महिलेवर अन्याय झाला आहे, त्यामुळे आपण सर्वांंनी याचा निषेध करायला हवा, असेही त्या म्हणाल्या. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीसाठी तयार आहे काय, असे विचारले असता सुळे म्हणाल्या की कोणताही पक्ष हा निवडणुकीसाठी नेहमीच तयार असतो. देशात लोकसभेच्या निवडणुका केव्हा होतील, हे सांगता येईल; मात्र विधानसभेच्या निवडणुका केव्हा, हे सांगता येणार नसल्याचे सांगत मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असे सूचक विधान त्यांनी केले.
मध्यावधीसाठी तयार - सुप्रिया सुळे
By admin | Published: June 20, 2017 4:31 AM