लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : येथे अद्ययावत कोविड रुग्णालय उभारण्याला तत्वतः मंजुरी मिळाली असून, या संदर्भातील प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात असल्याची माहिती तहसीलदार सुनील सावंत यांनी दिली.
सिंदखेडराजा येथे अद्ययावत कोविड रुग्णालय असावे, या संदर्भात ‘लोकमत’ने चार दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझरे काजी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पत्र देऊन कोविड हॉस्पिटल उभारण्याची आग्रही मागणी केली आहे. सिंदखेडराजा मतदार संघातील ग्रामीण व शहरी जनतेला कोरोनाची लागण झाल्यास जालना येथील खासगी रुग्णालयामध्ये भरती व्हावे लागते़. येथे वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याने मोठी अडचण होत आहे. सद्यपरिस्थितीत जालना येथील खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. बुलडाणा येथील रुग्णालय शंभर किलोमीटर दूर असल्याने तेथे पोहोचणे या भागातील रुग्णांना शक्य नाही़. अशा परिस्थितीत सिंदखेडराजा येथे कोविड रुग्णालय असणे गरजेचे होते. सिंदखेडराजा व तालुक्यातील जनतेची ही मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे.
दरम्यान, शनिवारी विभागीय अधिकारी सुभाष दळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझरे काजी, तहसीलदार सुनील सावंत, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देव घुमान, वैद्यकीय अधीक्षक डॉ़. सुनीता बिराजदार, नायब तहसीलदार प्रवीण लटके, डॉ़. प्रवीण तायडे, प्रा. मधुकर गव्हाड, संभाजी पेठकर, राजेंद्र आंभोरे, नगरसेवक गणेश झोरे, अजीम शेख, यासीन शेख, वैभव मिणासे, मंगेश खुरपे, जाधव, कंत्राटदार संतोष बुरकुल यांनी मराठा सेवा संघाचे महिला रुग्णालय व येथील सहकार शाळेची पाहणी केली. सेवा संघाच्या महिला रुग्णालयात ४० बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात येणार असून, सहकार शाळेतही शंभर बेड वाढविण्यात येणार आहेत. कोविड रुग्णालयामध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधा असणार आहे. यासाठी स्वतंत्र स्टाफची मागणी करण्यात येणार आहे.