लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. अमरावती महसूल विभाग मतदारसंघातून मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी बाजी मारली आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस शेकाप आणि शिवसेना यांनी आपले पॅनल बनवले होते. दरम्यान, २ मार्च रोजी निकाल जाहीर झाला. त्यामध्ये अमरावती महसूल विभाग मतदारसंघातून यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील प्रविण देशमुख हे ४८८ मतांनी विजयी झाले आहेत. तर बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी ४३७ मते मिळवून विजय प्राप्त केला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ६ महसुल आणि ४ व्यापारी अशा एकूण १० मतदारसंघाची निवडणूक २९ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. या निवडणुकीमध्ये एकूण ५८ उमेदवार रिंगणात होते. ६ महसूल विभागात एकूण ३ हजार ९२८ मतदारांपैकी ३ हजार ८७८ मतदारांनी मतदान केले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी कांदा-बटाटा बाजाराच्या आवारातील लिलावगृहात झाली.(प्रतिनिधी)
मुंबई ‘कृउबास’ निवडणुकीत मेहकरची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 2:23 PM