खामगाव (बुलढाणा) : तुरीच्या भावात गत काही महिन्यात हजार रूपयांनी वाढ झाली आहे. तुरीला खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत २ सप्टेंबर रोजी १२ हजार ६४० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तसेच मलकापूर बाजार समितीत तुरीला १२ हजार ८०० रूपये भाव मिळाला. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत गतवर्षी खरीप हंगामातील पिकांना अल्प भाव मिळाले. सोयाबिनला दोन वर्षांपूर्वी ७ हजार रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता तर कपाशीला अकरा हजार रूपये भाव मिळाला होता.
गतवर्षी मात्र या दोन्ही पिकांना चांगला भाव मिळाला नाही. तुरीच्या भावात मात्र सातत्याने वाढ होत आहे. तुरीला खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत २ सप्टेंबर रोजी ६००० ते १२ हजार ६४० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तसेच ८३६ क्विंटल आवक वाढली. तसेच मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला १२ हजार ८०० रूपये भाव मिळाला. तसेच १३८ क्विंटल आवक झाली. सोयाबिनचे भाव कायम असून, २ सप्टेंबर रोजी खामगाव बाजार समितीत ४ हजार ते ५२०० रूपये भाव मिळाले. सोयाबिनची १६०० क्विंटल आवक झाली. मलकापूर बाजार समितीत सोयाबिनला ४४७० ते ४९५५ रूपये भाव मिळाले. यावर्षी पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात घट येणार आहे. त्यामुळे शेतमालाचे भाव वाढणार असल्याचा अंदाज व्यापार्यांनी व्यक्त केला आहे.