कचऱ्याची कोंडी सुटेना
मोताळा : बसस्थानकासमोर गत काही महिन्यांपासून कचऱ्याचे साम्राज्य आहे. कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. कोरोनाकाळात स्वच्छता ठेवण्याची मागणी शे. बिलाल यांनी नगरपंचायतीकडे केली आहे.
स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू
बुलडाणा : स्मार्ट कार्डसाठी डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान नोंदणी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित बसस्थानकावरून स्मार्ट कार्ड कार्यालयीन वेळेत नेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना लसीकरणाचा वेग वाढवा
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संक्रमणाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक असलेल्या शहरांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी विनोद सोनोने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अवकाळी पावसामुळे आंब्याचा फुलोर झळला
मोताळा : तालुक्यात गत आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे माकोडी शिवारातील सुगदेव चिमकर या शेतकऱ्याच्या शेतातील आंब्याचा फुलोर झळला. त्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
थकीत वसुलीसाठी पालिकांची धडक मोहीम
बुलडाणा : थकीत मालमत्ताकराच्या वसुलीसाठी जिल्ह्यातील पालिकांनी कंबर कसली आहे. मार्चअखेरीस सुटीच्या दिवशीही जिल्ह्यातील नगरपालिका आणि पंचायतींमध्ये करवसुली केली जाणार आहे.
पीक नुकसानीचे पंचनामे करा
बुलडाणा : अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची तत्काळ पाहणी करून पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. माळविहीर, सुंदरखेड परिसरातील पीक नुकसानीची पाहणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली.
होळीसाठी नैसर्गिक रंगांची निर्मिती
बुलडाणा : निसर्ग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने होळीसाठी नैसर्गिक रंगांची निर्मिती करण्यात आली. नैसर्गिक कंद आणि झाडांच्या फुलांचा वापर रंग निर्मितीसाठी करण्यात आला आहे.
लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन
बुलडाणा : कोरोना संचारबंदी काळात कोविड आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात आहे. शनिवारी सायंकाळी तीन व्यावसायिकांना दुकाने उघडी ठेवल्याबाबत दंड ठोठावला.
चिंचखेडनाथ येथे पाणीटंचाई
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील चिंचखेडनाथ सोबतच जिल्ह्यातील चार गावांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे चिंचखेडनाथ येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
मोताळा : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता उद्रेक लक्षात घेता, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोरोना आपत्ती व्यवस्थापन नियमांचे पालन करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाकडून केले जात आहे.