- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खासगी कंपनीतील कर्मचारी, कामगारांना जीवन विम्याचा लाभ मिळावा यासाठी पॉझिटिव्ह रूग्णांचे स्वॅब खरेदी विक्रीचे जाळे आता शहरातील खासगी रूग्णालयांपर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. कंपनीतील काही कामगारांनी खासगी कोविड रूग्णालयात पॉझिटिव्ह स्वॅबची मागणी केल्याचेही समोर आले आहे. खामगावात पॉझिटिव्ह स्वॅब खरेदी-विक्री करणाºयाचा टोळीचा भंडाफोड झाल्यानंतर याप्रकरणात दररोज वेगवेगळे तथ्य समोर येत आहे. सामान्य रूग्णालयातील कंत्राटी कर्मचारी, शिवांगी बेकर्स मधील कामगार आणि काही खासगी कोविड रूग्णालयातील कर्मचाºयांच्या संगनमताने हा नियोजित प्रकार घडल्याचे समोर येत आहे. लवकरच या प्रकरणातील मोरक्या आणि त्याच्या साथीदाराला अटकेची तयारी पोलिसांनी केली आहे. अटकेतील एक आरोपी खासगी कोविड रूग्णालयातील एका डॉक्टराचा जवळचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. खासगी कोविड रूग्णालयांशी संगनमत करून काही कामगारांनी स्वॅब खरेदी केल्याचे बिंग फुटल्याने आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
एक कक्षसेवक; चालकाची भूमिका संशयास्पद!विम्याच्या लाभासाठी पॉझिटिव्ह रूग्णांचे स्वॅब घेवून विक्री प्रकरणात सामान्य रूग्णालयातील एका कंत्राटी कर्मचाºयास आणि त्याच्या साथीदार पोलिसांनी अटक केली आहे. त्याचवेळी दुसरा एक कंत्राटी कक्षसेवक आणि एक कंत्राटी चालक घटनेपासून फरार आहे.त्या दोघांचा शोध पोलिसांकडून घेतल्या जात आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ!या प्रकरणात एका स्थानिक लोकप्रतिनिधीचे नाव समोर येत आहे. त्याचवेळी शिवांगी बेकर्सचे सर्वाधिक कामगार राहत असलेल्या परिसरातील युवा नेत्याचीही पोलिसांनी चौकशी केली. या दोघांनी ५-६ स्वॅबचे पैसे परत केले. या दोघांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे समजते.
तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी! सामान्य रूग्णालयातील कंत्राटी कक्षसेवक विजय राखोंडे, चंद्रकात उमप आणि शिवांगी बेकर्स कंपनीतील कामगार गजानन प्रकाश सुलताने (३० रा. गोंधनापूर) अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनाही शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना सोमवारपर्यंत म्हणजेच दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.