सिंदखेडराजा : काेराेनामुळे गतवर्षीपासून शाळा बंदच आहे़ ऑनलाइन अध्यापन सुरू असले तरी अनेक खासगी शाळा पूर्ण शुल्क वसूल करीत असल्याने पालक त्रस्त झाले आहेत़ त्यामुळे खासगी शाळांनी शुल्क कमी करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे़
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे जिकिरीचे झाले आहे. शैक्षणिक संस्था मात्र कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही शिक्षण संस्था आपल्या शुल्कामध्ये एक रुपयाही कमी करण्यास तयार नाहीत. ज्या सुविधा गेल्या वर्षभर वापरल्या नाहीत, त्या सुविधांचेही शुल्क मागील वर्षी शिक्षण संस्थांनी वसूल केले. संकटाच्या काळामध्ये शिक्षणासारख्या पवित्र व्यवसायामध्येसुद्धा संस्था आपला नफा सोडायला तयार नाहीत.
सद्य:परिस्थितीत पालकांकडे शुल्क भरण्याची आर्थिक क्षमताच नाही. त्यामुळे खासगी शाळांनी शुल्क कमी करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. येथील सहकार विद्यामंदिराच्या प्राचार्यांना सदरील निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र आंभोर, मंगेश खुरपे, यासीन शेख यांची उपस्थिती होती.