डॉ़ बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स शाखा नागपूरच्या वतीने महाराष्ट्र राज्यभरात राज्यस्तरीय अभिवादन प्रश्नोत्तरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देऊळगाव राजा हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देऊळगाव राजा मधील तब्बल ३०९ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांना डॉ़ बाबासाहेब आंबेडकर लिखित नऊ पुस्तके वाचण्यासाठी देण्यात आली. पुस्तके वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचा कालखंड देण्यात आला व नंतर ही परीक्षा घेण्यात आली.
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत देवळगाव राजा ज्युनियर कॉलेज कला शाखेचा प्रवीण रामेश्वर साखरे याने शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल त्याचा शाळेचे माजी प्राचार्य डी.बी.राजपूत,शाळेचे कार्यालयीन कामकाज प्रमुख आर.बी.कोल्हे,पर्यवेक्षक डी. व्ही.जाधव, त्याचे मार्गदर्शक प्रा़ सुरेश राठी,प्राध्यापक गजानन गाडेकर, प्रा़ किरण जायभाये, अभिवादन प्रश्नोत्तरी स्पर्धेचे प्रभारी शिक्षक इंद्रजीत सोनपसारे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख वनश्री जनाबापू मेहेत्रे, डी. बी.घंटे आदींनी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रवीणचा सत्कार केला. याप्रसंगी आयोजकांच्या वतीने डी.बी.राजपूत व प्रभारी शिक्षक इंद्रजीत सोनपसारे यांचाही प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी विकासाला चालना मिळण्यासाठी अशा स्वरूपाचे उपक्रम अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राजपूत यांनी केले. तर या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी प्रभारी शिक्षक इंद्रजीत सोनपसारे व शाळेच्या सांस्कृतिक विभागाचे काैतुक केले़