महावितरणच्या कारभाराबद्दल मलकापूर पांग्रावासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मलकापूर पांग्रा येथील वीज वितरण कंपनीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. येथील झाडाची छाटणी न केल्यामुळे झाडाच्या फांद्या थेट विद्युत तारांना जाऊन भिडलेल्या आहेत. त्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. गावामध्ये बाजार गल्लीतील रोहित्र जळाली आहे. त्या रोहित्राला दुरुस्त करण्यासाठी नेले आणि दुसरे रोहित्र आणले; परंतु तेही नादुरुस्त निघाले. त्यामुळे अर्ध्या गावातील विद्युत पुरवठा गूल आहे. याबाबत सबस्टेशनला फोन केला की कोणी फोन उचलत नाही. महावितरणच्या अभियंत्याला फोन केला की त्यांचा फोन नॉटरिचेबल असतो. त्यामुळे करावे काय असा प्रश्न गावकऱ्यांसमोर पडला आहे. या सबस्टेशनमधून देऊळगाव कोळ, वाघाळा, झोटिंगा येथे वीजपुरवठा होतो. मलकापूर पांग्रा केंद्राला झोटिंगा, देऊळगाव कोळ ही गावे जोडलेली आहेत. त्यामुळे या तिन्ही गावांत कुठेही बिघाड झाला की तिन्ही गावांचा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यासाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा हे रोहित्र स्वतंत्र करावे, अशी मागणी केली आहे.