बुलडाणा : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणेद्वारा संचालित बुलडाणा तालुक्यातील पाडळी येथे गांधी घर स्थापन करण्यात आलेले आहे. मात्र गेल्या काही वर्षांंपासून पाडळी येथील गांधी घराच्या जागेवर एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेने अतिक्रमण केले आहे. पाडळी येथील गांधी घर अतिक्रमणाच्या भोवर्यात सापडल्याने विविध कामे करण्यास अडचणी येत असल्याची माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणेचे विश्वस्त सचिव अनवर राजन यांनी दिली आहे. स्थानिक पत्रकार भवन येथे १ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रा.बी.डी. खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना अनवर राजन म्हणाले, की महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे पुणेसह औरंगाबाद, नागपूर येथेसुद्धा मुख्य कार्यालय आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यात महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणे अंतर्गत विविध कामे करण्यासाठी पाडळी येथे गांधी घर शाखा स्थापन करण्यात आलेली आहे. परंतु पाडळी येथील गांधी घराच्या जागेवर गेल्या सहा ते सात वर्षांंपासून एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेने अतिक्रमण थाटले आहे. सदर शाळेकडे अनेक वेळा अतिक्रमण काढण्याची गांधी मार्गाने विनंती केली आहे. मात्र सदर अतिक्रमण हटविण्यास शाळा तयार नसल्याने संस्थेच्या विविध कामे करण्यास अडचणी येत आहेत. त्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रा.बी.डी. खरात म्हणाले, की महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणेच्यावतीने पाडळी येथील गांधी घर याठिकाणी ग्रंथालय, अभ्यासिका निर्माण करण्याचे नियोजन आहे. तसेच गांधीवादी विचारावर शिबिरे, महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन यासारखे उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. परंतु त्यासाठी गांधी घराच्या जागेवर झालेले अतिक्रमण अथडळा निर्माण करीत असल्याचा आरोप यांनी केला आहे. दरम्यान पाडळी येथील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष वामनराव पवार यांनी ग्राम विकास मंडळ पाडळी यांनी गांधी स्मारकासाठी पाडळी येथे जागा भेट दिली असल्याचे स्पष्ट करून ती जागा तात्पुरत्या स्वरूपासाठी शाळेकरिता व सेंट्रल बँकेला भाडे तत्त्वावर देण्यात आलेली आहे. यामध्ये कोणताही गैरप्रकार नसल्याचे स्पष्ट केले.
पाडळी येथील गांधी घरावरील अतिक्रमणामुळे अडचणी - राजन
By admin | Published: July 02, 2016 12:53 AM