चिखली : शहरात एका कार्यक्रमानिमित्त ६ एप्रिल रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आले असता त्यांना स्थानिक संत रविदास नगरमधील विविध समस्यांसंदभार्तील निवेदन देऊन या भागातील समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी छोटू कांबळे यांनी केली आहे.
शहरातील वार्ड क्रमांक ७ मधील संत रविदास नगरमधून भला मोठा नाला वाहत असतो. दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरते. त्यामध्ये सर्व रहिवाशांचे प्रचंड नुकसान होते. नाल्याची नियमित साफसफाई होत नसल्याने दूर्गंधी असते. गेल्या ३० वर्षांपासून हीच परिस्थिती असल्याचा आरोप करीत या नागरिकांना अद्यापपर्यंत कुठलीच योजना व सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. तरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत येथील दीनदलित, गोरगरिब नागरिकांना त्वरीत रस्ते, नाल्याचे खोलीकरण, नूतनीकरण व अंडरग्राऊंड नाली करण्यात यावे. तसेच येथील जागेवरील आरक्षण वगळून स्थानिक रहिवाशांना त्वरीत घरकुल आदी सोयीसुविधा देण्यात यावे व इतर समस्या दूर कराव्यात, अशी मागणी छोटू कांबळे यांनी पालकमंत्री डॉ.शिंगणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. दरम्यान या मागणीची दखल घेत डॉ. शिंगणे यांनी लवकरच या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.