संदीप वानखडे
बुलढाणा : पवित्र पाेर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या टप्प्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तथा शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. याविषयीचे पत्र १३ सप्टेंबर राेजी देण्यात आले आहे.
पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून सध्या शिक्षक भरती सुरू आहे. मुलाखतीविना भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तसेच मुलाखतीसह या पदभरती प्रकारात ३१ ऑगस्टपर्यंत खासगी संस्थांवरील रिक्त जागांसाठी मुलाखत आणि अध्यापन काैशल्य चाचणी घेण्यात आली आहे. आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. बिंदुनामावलीतील त्रुटींबाबत सर्व जिल्हा परिषदांकडून शहानिशा करण्यासाठी १० टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या हाेत्या.
या जागा भरण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी बिंदुनामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये काेणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून १० टक्के पदभरतीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षक आयुक्तांनी दिले आहेत तसेच भरती प्रक्रियेतील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेत अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहे.