बुलडाणा : आरटीईअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशासाठी गतवर्षी मुले मिळाली नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीसुद्धा २५ टक्के प्रवेशाच्या जागा रिक्तच राहिल्याने गतवर्षाची प्रक्रिया अर्धवटच राहिली. राज्यातील गतवर्षीचा गोंधळ संपत नाही, तोच नववर्षातील २५ टक्के प्रवेशाला सुरुवात करण्यात आली आहे. २१ जानेवारीपासून शाळा नोंदणी सुरू झाली आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी आरटीई २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया कोरोनामुळे गतवर्षी अडचणीत सापडली होती. कोरोनामुळे लॉकडाऊन लागण्यापूर्वी पालकांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. २०२०-२१ या शैक्षणिक सत्रामध्ये जिल्ह्यात सुमारे २३१ शाळांमध्ये आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी दोन हजार ७८५ जागा भरण्याचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल होते. पहिल्या टप्यातच ऑनलाइन अर्ज करण्याचा हा कोटा पूर्ण झाला होता. जिल्हाभरातून तब्बल सहा हजार ५१० विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज आले होते. त्यानंतर निवड प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु, कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेण्याकडे पालकांनी पाठ फिरविली. प्रवेश होऊ शकले नाही, त्यामुळे अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे गतवर्षी प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ उडालेला असताना आता २०२१-२२ या नवीन वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. २१ जानेवारीपासून आरटीई प्रवेशपात्र शाळांची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.
शाळांना दिली ८ फेब्रुवारीची मुदत
ऑनलाइन नोंदणीसाठी शाळांना ८ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. नोंदणीकरिता १५ दिवसांचा कालावधी शाळांसाठी देण्यात आला आहे. आरटीई प्रवेशपात्र २०२०-२१ च्या अॅाटो फॉरवर्ड केलेल्या शाळांची पडताळणीही या कालावधीत करण्यात येणार आहे.
असे आहे वेळापत्रक
१) शाळांची नोंदणी २१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी
२) पालकांनी ऑनलाइन अर्ज भरणे ९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी
३) सोडत (लॉटरी) काढणे ५ मार्च ते ६ मार्च
४) कागदपत्रांची पडताळणी आणि प्रत्यक्ष प्रवेश निश्चित९ मार्च ते २६ मार्च
५) प्रतीक्षा यादी २७ मार्चनंतर
आरटीईअंतर्गत २५ प्रवेशासाठी २१ जानेवारीपासून शाळांची नोंदणी सुरू झाली आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी पूर्ण होईल. त्यानंतर पालकांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल. याबाबतचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
सचिन जगताप, प्रभारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा