दरम्यान, आता १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभागा पूर्वतयारी करत असून, मतदान यंत्रांची वाहतूक करण्यासाठी वाहनांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास ४१७ वाहने निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी लागणार आहे. शनिवारी बुलडाणा तालुक्यातील ५१ ग्रामंपचायतींमधील ४४६ जागांसाठीच्या होणाऱ्या निवडणुकीची महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागली आहेत.
तहसीलदार रूपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार व अन्य कर्मचाऱ्यांनी ही ईव्हीएम सिलिंगची किचकट प्रक्रिया पारपडली. बुलडाणा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची २२१ मतदान केंद्र आहेत. यासाठी २३५ बॅलेट युनिट व २२१ कंट्रोल युनिट लागणार आहे. सोबतच आपत्कालीन स्थितीसाठी काही मतदान यंत्रे राखीव ठेवण्यात आलेली असल्याची माहिती तहसीलदार रूपेश खंडारे यांनी दिली. यासोबतच शनिवारी मतदान यंत्रात विविध प्रवर्गांतील १,१७१ उमेदवारांची नावे व त्यांची चिन्हे टाकण्यात आल्यावर यंत्रे सील करण्यात आली. आता ही यंत्रे प्रत्यक्ष मतदानासाठी तयार असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले. या सिलिंगसाठी ५२ नियमित व ८ राखीव कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले, नायब तहसीलदार मंजूषा नेताम, अमरसिंह पवार, श्रीमती गौर, लक्ष्मण भामळे यांच्यासह विजय टेकाळे, नितीन पाटील, अविनाश गोसावी, अतुल झगरे, समाधान जाधव यांनी ही सिलिंगची पूर्ण प्रक्रिया पारपाडली.
दीड लाख मतदार
बुलडाणा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला निवडणूक होत असून, या निवडणुकीत तालुक्यातील १ लाख ४९ हजार ६४४ मतदार मतदान करतील. त्यामध्ये ७७ हजार ९२४ पुरुष व ७१ हजार ७२० महिला मतदारांचा समावेश आहे.