लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: येथील जगदंबा रोडवरील खंडोबा मंदिरात चैत्र पोर्णिमा अर्थातच हनुमान जयंतीला १२ बैलगाड्या ओढण्याची दीडशे वर्ष जुनी पंरपरा आहे. ही परंपरा अबाधित ठेवण्यासाठी गडकरी (१२ बैलगाडे ओढणारे) यांना विशेष मान आहे. या गडकर्यांचे विधिवत पूजन करून खामगावातून मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी गडकर्यांची हळद माखणी सोहळा मंदिरात पार पडला.
श्रध्दा आणि भक्तीचा सोहळा असलेल्या या पुरातन पर्वाची अनेकांना ओढ लागून असते. चैत्र पोर्णिमेच्या ९ दिवस अगोदरच घट स्थापनेने १२ गाड्या ओढण्याच्या अनोख्या परंपरेची सुरूवात केली जाते. त्यानंतर चैत्र पोर्णिमेच्या अडीच दिवस अगोदर बैलगाडे ओढणार्या गडकर्यांना हळद माखून मिरवणूक काढली जाते. अतिशय भक्तीभावाने साजरा केल्या जाणार्या या सोहळ्याने खामगावातील अनेकांना आकर्षण असते. १२ बैलगाडी ओढणारे सात, नऊ, ११ गडकरी अथवा त्यापेक्षाही अधिक संख्येेने संपूर्ण श्रध्देने या सोहळ्यात हजेरी लावतात. मंगळवारी हळद माखलेल्या गडकर्यांची शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खंडोबाचा भंडारा म्हणून गडकर्यांनी सामान्यांना तसेच मान्यवरांना हळदीचा िटका लावून उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.सर्व धर्मियांचा सहभाग
ऐतिहासिक आणि देशातील एकमेव खामगाव शहरात साजरा होणार्या शांती महोत्सवाच्या ठिकाणी म्हणजेच जगदंबा रोड, जलालपुरा येथे खंडोबाचा उत्सव पार पडतो. मोठी जगदंबा देवी परिसरातच हा महोत्सव साजरा होतो. त्यामुळे या उत्सवाचे अनन्य साधारण महत्व असून कमलसिंह गौतम चौकातून बारा बैलगाडे ओढण्यात येतात. या उत्सवात सर्व धमिर्यांचा सहभाग असतो.
बारा बैलगाडे ओढण्याची दीडशे वर्ष पुरातन परंपरा जोपासण्यासाठी खंडोबा मंडळाचे प्रयत्न आहेत. यंदा गुरूवारी सायंकाळी हा सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी खंडोबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. मंगळवारी गडकर्यांना हळद लावली गेली. - रविकांत भोसले
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"