लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भरडधान्य खरेदी ३१ डिसेंबरपर्यंतच करण्याचा आदेश असला तरी त्या आदेशानुसारच प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित धान्याची उत्पादकता कृषी विभागाने ठरवल्यानुसारच शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्याची उत्पादकता अद्यापही न ठरल्याने खरेदी सुरू होण्याची चिन्हे धुसरच आहेत. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत धान्य विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गंत २०२०-२१ मध्ये ही योजना सुरू होत आहे. भरड धान्य खरेदी योजनेंतर्गंत ज्वारी, मका, बाजरीच्या खरेदीला १ नोव्हेंबरपासून सुरूवात केली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून ३१ डिसेंबरपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा आदेश शासनाने दिला आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन, राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत खरेदी प्रक्रीया राबवली जाणार आहे. ज्वारी, बाजरी मका, धान, रागी या भरड धान्याची खरेदी या संस्थांकडे देण्यात आली. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता कृषी विभागाने ठरवावी, त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्यांकडे असलेल्या धान्याची खरेदी करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात अद्यापही पिकांची उत्पादकता निश्चित झालेली नाही. लगतच्या काळात ती होईल, याची शक्यता नाही. कृषी विभागाने पीक कापणी प्रयोगाचे अहवाल प्राप्त नाहीत. त्यामुळे उत्पादकता निश्चित करण्यास वेळ लागणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी केली जात आहे, असा पवित्रा घेतला आहे. उत्पादकता निश्चित केल्यानंतर शेतकऱ्यांचे किती धान्य खरेदी केले जाईल, हे पुढे येणार आहे. सोबतच प्रत्येक जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या भरडधान्याची खरेदी करण्यासाठी आवश्यकतेनुसार केंद्राची निर्मिती संबंधित जिल्हाधिकारी करणार आहेत. प्रत्येक केंद्र व त्याठिकाणी जोडली जाणारी गावेही निश्चित केली जाणार आहेत.
भरडधान्याची उत्पादकताच ठरली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 1:05 PM