बुलडाणा: सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रलंबीत विविध मागण्यांसाठी राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये जिल्ह्यातील सुमारे २०० प्राध्यापकांनी सहभाग घेतला असून महाविद्यालयांचे कामकाज बंद ठेवून शासनाच्या शैक्षणिक धोरणांचा निषेध नोंदविला. राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, अनेक दिवसांपासून रखडलेल्या मागण्या, पदभरतीवर लादलेली बंदी, थकित ७१ दिवसांचे वेतन मिळावे, नविन प्राध्यापकांना जुनीच पेन्शन योजना सुरू करण्यात यावी, अभ्यास मंडळ नियुक्त्यामधील गोंधळ दूर करावा, तासिका तत्त्वावरील मानधन वाढवावे यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापकांची संघटना एमपुक्टोच्यावतीने हा संप पुकारण्यात आला आहे. एमपुक्टोचे जिल्ह्यातील जवळपास २५० प्राध्यापक असून यापैकी २०० प्राध्यापकांनी या आंदोलनात सहभाग घेऊन महाविद्यालयीन कामकाज बंद ठेवले आहे. यापूर्वीही अनेकवेळा प्राध्यापक संघटनांनी आंदोलन केले; मात्र शासनाकडून काहीच दखल घेतल्या जात नसल्याने मंगळवारला कामबंदच्या मार्गाने आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती वरीष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. मधु सोनुने यांनी दिली.
विविध संघटनांचा सहभाग जिल्ह्यातील अनेक प्राध्यापकांनी बेमुदत कामबंद आंदोलन करून एमपुक्टो या महाराष्ट्रातील संघटनेस पाठींबा दिला आहे. अमरावती विद्यापीठांतर्गत येणाºया संघटना, सी. एच. बी. प्राध्यापक, नेटसेट प्राध्यापकांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील प्राचार्य फोरम व संस्था चालकांनी सुद्धा आंदोलनास संपूर्ण पाठींबा जाहीर केल्यामुळे काही महाविद्यालयात १०० टक्के काम बंद आहे.
प्राध्यापकांचा संघर्ष सुरूचशासनदरबारी असलेल्या प्रलंबीत मागण्या निकाली काढण्यासाठी राज्यभरातील प्राध्यापकांकडून २ जुलै २०१८ पासून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन पुकारण्यात येत आहेत. ६ आॅगस्टला प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदविला. त्यानंतरही अनेकवेळा धरणे आंदोलन, जेलभरो आंदोलन, एकदिवशीय सामुहिक रजा आंदोलन केले. परंतू शासनाकडून त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने प्राध्यापकांचा आपल्या मागण्यांसाठी संघर्ष सुरूच असल्याचे दिसून येते.