गणेश भालके
धामणगांव धाडः वातावरणातील बदलामुळे पारंपरिक पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते़ त्यामुळे, शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयाेग करणे सुरू केले आहे़ धामणगाव धाड परिसरात शेतकऱ्यांनी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले असून ही मिरची अकाेला,अकाेट आणि नागपूरपर्यंत विक्रीस जात आहे़ मिरचीच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न हाेत आहे़
धामणगांव परिसरात मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात मल्चिंग पेपरवर व मुबलक पाणी साठ्यावर लागवड केलेली मिरची व पिके मोठ्या प्रमाणात बहरली आहे़ गेल्या वर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाने कडक निर्बंधामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़ अनेक शेतकऱ्यांनी मिरचीच्या लागवडीकडे पाठ फिरवली होती़ त्यानंतर निर्बंधामध्ये शिथिलता आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी हिरवी मिरचीचे लाखाे रुपयांचे उत्पादन घेतले हाेते़ सुरुवातीला हिरवी मिरचीला ४० ते ६० रुपयांचा भाव मिळाला असताना अनेक शेतकरी यांना फायदा झाला़ यावर्षी सुरूवातीपासूनच परिसरातील धामणगावसह वालसांवगी , पारध मासरूळ डोमरूळ टाकळी तराडखेड आदी भागात लाखो हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली आहे़ काेराेनाची स्थिती असतानाही मोठ्या प्रमाणावर ठिबक सिंचनाद्वारे मल्चिंग पेपरवर अंदाजे ७० ते ७५ टक्के मिरची लागवड झाली आहे. व्यापारी शेतातच मिरची विकत घेत आहे़ धामणगावची मिरची नागपूर , अमरावती , अकोट .अकोला , बुलडाणा , मुंबई वाशी , अहमदनगर , दिल्ली , भुसावळ येथील व्यापारी खरेदी करीत आहेत.
मिरची आठवडाभरावर तोडणीसाठी येणार असून राज्य शासनाने कोरोनाच्या संकटात मिरची लिलाव सुरू करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून शेतकरी व मिरची उत्पादकांचे नुकसान होणार नाही़ लिलावामुळे शेतकऱ्यांचा चांगला भाव मिळेल़
- शेषराव काळे, मिरची उत्पादक शेतकरी, धामणगांव धाड