बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढली असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालये ही २८ फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी एका आदेशानुसार स्पष्ट केले आहे.बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात कोरोनाचा ससंर्ग वाढला असून बुधवारीही १९९ जण कोरोेना बाधीत आढळून आले आहेत. परिणामी १७ फेब्रुवारी रोजी हा आदेश काढण्यात आला आहे. सोबतच धार्मिक सण, उत्सवावरही बंधने लादण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मिरवणूक, रॅली काढण्यासही पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारही दुपारी चार नंतर बंद ठेवण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. शहरी तथा ग्रामीण भागातही या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाणार असून पालिका मुख्याधिकारी व तालुका दंडाधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. पोलिस प्रशासनानेही यंत्रणेला त्यानुषंगाने सहकार्य करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सुचना दिल्या आहेत. एकंदरीत शहरी तथा ग्रामीण भागातही पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्रीत येवू नये असे या आदेशाने स्पष्ट करण्यात आले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात जमावबंदी, शाळा-महाविद्यालेही राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:10 PM