लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर शिवारांमध्ये हंगामपूर्व कपाशी लागवड झाल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने १ जूनपर्यंत बीटी बियाणांच्या विक्रीवर प्रतिबंध लावला आहे. तसा आदेश ३० एप्रिल रोजी सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना दिला आहे. जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा सर्वाधिक प्रकोप खरीप २०१७ मध्ये झाला होता. यंदाच्या हंगामात गुलाबी बोंडअळीचा उपद्रव होऊ नये, यासाठी आतापासूनच उपाययोजना प्रस्तावित केल्या जात आहेत. कपाशीची हंगामपूर्व पेरणी झाल्यास बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होणार नाही. याउलट पुनरुत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोंडअळीचा जीवनक्रम खंडित करण्याच्या प्रमुख उपायांपैकी एक प्रभावी उपाययोजना म्हणून यंदा हंगामपूर्व कपाशीची लागवड होणार नाही, याची खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना हंगामपूर्व बियाणेच उपलब्ध होऊ न दिल्यास हंगामपूर्व लागवड टाळता येऊ शकते. त्यामुळेच १ जूनपर्यंत बीटी बियाणांच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. या सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित कंपनी, वितरक, किरकोळ विक्रेता यांच्यावर महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्य किमतीचे निश्चितीकरण यांचे विनियमन) अधिनियमात २००६ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
बोंडअळी रोखण्यासाठी १ जूनपर्यंत बियाणे विक्रीला प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 11:57 AM