लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी ज्ञानगंगा धरणामध्ये उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, बुलडाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल होत असतानाच शेतकऱ्यांनी केलेल्या या कृतीमुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील निमकवळा येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प-२ बृहत लघुपाटबंधारे योजनेंतर्गत धरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आजपर्यंत मोबदला मिळाला नाही. त्यामुळे गेल्या २६ जानेवारीपासून शेतकऱ्यांनी प्रकल्पस्थळी आमरण उपोषण सुरू केले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी शुक्रवारी रोजी जलसमाधी घेत असल्याचे जाहीर केले होते. शुक्रवारी पहाटे ५ वाजता पोलिसांनी अवथळे यांना ताब्यात घेऊन खामगाव पोलिस स्टेशनला आणले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत धरणांमध्ये उड्या घेतल्या. शेतकऱ्याच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अवथळे यांना पोलिसांनी पुन्हा उपोषण स्थळी नेले. यावेळी अनंता वाघमारे, परमेश्वर निमकर्डे या शेतकऱ्यांनी धरणात उड्या घेतल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केले. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संत, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार शीतल रसाळ यांनी प्रकल्पस्थळी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोबदल्याच्या प्रश्नावर तोडगा काढणे शक्य नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक होत, मोबदला मिळत नाही, संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचे सांगितले.
पाच जणांना रुग्णालयात हलवलेउपोषणकर्त्यांपैकी सुरेंद्र राठोड, प्रकाश धोटे,अनंता वाघमारे, रमेश मुंडे, श्रीराम मुंडे या ५ शेतकऱ्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आंदोलनाला १२ दिवस उलटले आहेत.