लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विवेकाधिष्ठित विद्वत्ता ही सृजनात्मक विकासाला चालना देण्यासाठी कारणीभूत ठरते. तीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्यातून स्पष्ट होते. ग्रामगीता हे त्याचेच सार आहे, असे प्रतिपादन वारी भैरवगड येथील ज्ञानेश आश्रमाचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी येथे केले.बुलडाणा येथील स्व. पंकज लद्दड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड मॅनेजमेंट स्टडीज तथा भारतीय विचार मंचच्या विदर्भ शाखेच्यावतीने बुलडाण्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या विदर्भस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, प्रत्येक विद्वान हे संत असतात; परंतु सर्वच विद्वान हे संत असू शकत नाहीत. संतांनी देव व माणसांना जागविण्याचे काम केले आहे. संत वाड्मय अजिर्त नसून प्रासादिक आहे. शस्त्रक्रियेशिवाय हृदय परिवर्तन करण्याची शक्ती त्यात आहे. संत वाड्मय मनोरंजन नव्हे, तर मनोमंथनासाठी आहे, अशी भावनाही ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी व्यक्त केली. संमेलनाचे उद्घाटन रविवारी २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. प्रारंभी सकाळी ८.३0 वाजता ग्रंथदिंडीची परिसरातून परिक्रमा काढण्यात आली. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष आशिष चौबिसा, अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, आचार्य हरिभाऊ वेरुळकर, साहित्य संमेलनाचे संयोजक डॉ.दीपक लद्दड, रवींद्र लद्दड, प्राचार्य प्रदीप जावंधिया, जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर, नगरसंघचालक बाळासाहेब देशपांडे, नगर सहसंघचालक प्रा.विजयराव जोशी, प्राचार्य शांताराम बोटे, डॉ. विकास बाहेकर, प्रा. मोरेश्वर देशमुख, विहिंप विदर्भ संघटक मंत्री अरुण नेटके, आ. हर्षवर्धन सपकाळ, प्रवीण चिंचोळकर, गिरीश दुबे उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांमध्ये ज्ञानदेवांची प्रतिभा, नामेदवांचा प्रचार, नाथंची प्रपंच, तुकोबारायांचा प्रतिकार असे सर्व गुण होते. माणूस जोडण्याचे व घडविण्याचे मानवतेचे काम राष्ट्रसंतांनी केले आहे, असे ज्ञानेश्वर महाराज वाघ शेवटी म्हणाले. सोबतच ग्रामगीता ही तुकडोजी महाराजांच्या मातृहृदयाला सुटलेला पान्हा आहे. प्रबोधनासह परिवर्तनाची ताकद त्यामध्ये आहे.गुरुकुंज मोझरीचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांचेही यावेळी भाषण झाले. आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांनी राष्ट्रसंतांचे साहित्य संमेलन म्हणजे एकाच संताचे विचारांचे साहित्य संमेलन आहे. सर्व संतांचे विचार यात असतात, असे सांगितले. प्रास्ताविक प्रा.सुभाष लोहे यांनी केले. डॉ. दीपक लद्दड यांनी राष्ट्रसंताचे विचार समाज प्रबोधन तरुण पिढीवर संस्काराचे बीजारोपण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने आमच्या संस्थेला विदर्भस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाल्याने आयोजकांचे आभार मानले. सूत्रसंचालन अर्चना देव यांनी केले.
आजच्या शिक्षणाचा पाया राष्ट्रसंतांनी रचला उद्घाटनपर भाषणात बोलताना डॉ. राजेश जयपूरकर यांनी आजच्या आधुनिक शिक्षणाचा पाया राष्ट्रसंतांनी रचला. संत साहित्य आत्मशक्ती वाढविणारे असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाचा व कुटुंबांचा सार ग्रामगीतेत मांडला आहे. ही ग्रामगीता प्रत्येकाने वाचली पाहिजे. व्यक्ती विकासाच्या तथा जीवनाच्या प्रत्येक पैलूचा ग्रामगीतेच्या माध्यमातून अभ्यास करता येतो. त्यामध्ये या सर्व बाबींवर चिंतन झाले आहे, असे ते म्हणाले. सोबतच संत साहित्य अभ्यासक्रमात असले पाहिजे. त्यातून बालमनावर चांगले संस्कार रुजविल्या जातात, असे ते म्हणाले.