लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : मृता संधारणासोबतच गावात दुग्धोत्पादनालाही चालना मिळावी तथा त्या दृष्टीने गावात गुरांसाठी आवश्यक गवत उपलब्ध व्हावे या दृष्टीकोणातून गेल्या काही महिन्यापासून मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली (प्रजा) हे गाव प्रयत्न करत असून त्यांना यामध्ये बऱ्यापैकी यश येत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी वैशिष्टयपूर्ण असे पाच प्रकारचे गवत गाव परिसरात लावण्यात आले आहे.या गावामध्ये जवळपास ७० एकर गायरान क्षेत्र उपलब्ध असून त्यामध्ये सध्या हा प्रयोग सुरू आहे. गुरांसाठी नुसताच चारा उपलब्ध करणे हा यामागील उद्देश नसूर गाव परिसरातील जमीनीची धुप थांबवून मृदा संधारणासोबतच किटकापासून ते पक्षापर्यंत जैवसाखळी वृद्धींगत व्हावी हा यामागे मुख्य उद्देश असल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विनोद कदम यांनी सांगितले. त्यानुषंगाने खास राहुरी येथून पाच प्रकारे गवत आणून गारयान क्षेत्रात त्याची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने मारवेल, काळा अंजन, पांढरा अंजन, डोंगरी आणि पवन्या गवताचा समावेश आहे. विशेष म्हणजे गायरान परिसरात कुरण विकास कार्यक्रम सिंदखेड लपाली गावाने सुरू केला असून त्यामुळे या भागात चराई बंदी केली आहे. त्याचे दृष्यपरिणाही आता समोर येत असून या भागात गवत चांगले वाढले आहे. तसेच गावातीलच १० ते १५ शेतकऱ्यांना यातील गावत पुन्हा लागवडीसाठी देण्यात येत असून शेताच्या बांधावर ते लावण्यात येत असल्याने शेतीची धुप थांबून मृदा व जलसंधारणालाही मदत मिळत आहे. दरम्यान, दुग्धोत्पादनासाठी सिंदखेड लपाली गाव तसे फारसे नावाजलेले नाही. गरजेपुरतेच दुग्धोत्पादन येथे होते. मात्र आता हा नवा प्रयोग सुरू केल्यापासून येथे २०० लीटर दुध गोळा होत असल्याची माहिती माजी उपसरपंच दिलीप मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. येथे पुर्वी महतप्रयासाने एखादी कॅन दुध गोळा होत होते, असे ते म्हणाले. येत्या काळात याची व्याप्ती वाढणार आहे.
‘कुरण विकासा’च्या माध्यमातून सिंदखेड येथे दुग्धोत्पादनाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:19 PM