लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाकडून बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद आणि मेहकर तालुक्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामपंचायतींमध्ये दहा लाख रुपये खर्च मर्यादेत सामाजिक उपयुक्ततेच्या दृष्टीने विकास कामे घेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ६० लाखांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.यामध्ये प्रामुख्याने बावणबीर, आसलगाव, लोणी लव्हाळा, वडगाव गड, जामोद या गावांचा समावेश आहे. दरम्यान २२ सप्टेंबर २०१५ च्या अल्पसंख्यांक विभागाच्या पत्रकानुसार ज्या ग्रामपंचायतींमध्ये किमान १०० लोकसंख्या ही अल्पसंख्यांकाची आहे, अशा ग्रामपंचायतींमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून अशा पद्धतीचे प्रस्ताव मागविण्यात येत असतात. त्यानुषंगाने उपरोक्त ग्रामपंचायतींमधून शादीखाना, काँक्रिट रस्ते कब्रस्तान संरक्षण भिंत अशी कामे प्रस्तावीत करण्यात आली आहेत. आठ जुलै रोजीच जिल्हा परिषदेने यासंदर्भात जिल्ह्यातील पंचायत समित्यांना पत्र देऊन अनुषंगीक प्रस्ताव मागविले होते.त्यानुषंगाने उपरोक्त पाच गावामध्ये अल्पसंख्यांकांची लोकसंख्या ही ७.२६ टक्के ते ३८.५७ टक्क्यांच्या आसपास असल्याने या गावातून हे प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनास प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या चार सदस्यीय समितीने उपरोक्त प्रस्ताव छाननी करून मंजूर केले असून ते राज्य शासनास पाठविण्यात आले आहे. दरम्यान, आणखी काही ग्रामपंचायतींमध्ये अल्पसंख्यांकांची लोकसंख्या विचारात घेता असे प्रस्ताव येऊ शकतात. त्यादृष्टीने ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही जिल्हा परिषदेमधील सुत्रांनी स्पष्ट केले. यासाठी ग्रामपंचायतींचा ठराव, सरपंच, ग्रामसेवकांचे पत्र, खासदार आणि आमदारांचे शिफारस पत्र असणे अभिप्रेत आहे.(प्रतिनिधी)
पाच ग्रामपंचायतींमध्ये ६० लाख रुपयांच्या विकास कामांचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 3:18 PM