- नीलेश जोशी
बुलडाणा : जिल्ह्यांच्या दीर्घकालीन सर्वसमावेशक विकासासाठी तयार करण्यात येणार्या प्रादेशिक योजनेमध्ये (रिजनल प्लॅन) भविष्यातील सार्वजनिक सुविधांचा विचार करून शेगाव-पुणे रेल्वेमार्ग प्रस्तावीत करण्यात आला आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्याच्या प्रादेशिक योजनेस नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने प्रसंगी माईलस्टोन ठरणार्या या रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राज्य व केंद्र स्तरावर रेटा वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांच्या प्रादेशिक योजना बनविण्यासंदर्भात २०१६ मध्ये निर्णय घेण्यात आला होता. त्यानुषंगाने प्रादेशिक नियोजन मंडळाची स्थापना करून बुलडाणा जिल्ह्याची २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून ही प्रादेशिक योजना बनविण्यात आली होती. त्यात रस्ते आणि रेल्वे मार्गासंदर्भात विचार करून खामगाव-जालना रेल्वे मार्गासोबतच शेगाव-बुलडाणा-अजिंठा-औरंगाबाद-नगर-पुणे हा नवा रेल्वे मार्ग प्रस्तावीत करण्यात आला आहे. नागपूर-मुंबई या मध्यरेल्वे मार्गावरील वाढता ताण, मालगाड्यांचा प्रश्न आणि विदर्भ तथा पुणे जिल्ह्याची कनेक्टीव्हीटी विचारात घेऊन शेगाव-पुणे हा मुंबईला पोहोचण्यासाठीचा पर्यायी लोहमार्ग म्हणून विकसीत करण्याची भूमिका बुलडाण्याच्या प्रादेशिक नियोजन मंडळाने बनविलेल्या प्रादेशिक योजनेमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्याच्या प्रादेशिक योजनेला मंत्रालयातील नगर विकास विभागाने एक जानेवारी २०१८ रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे शेगाव-बुलडाणा-औरंगाबाद-पुणे या रेल्वे मार्गासाठी जिल्हास्तरावरून लोकप्रतिनिधी कितपत रेटा देतात आणि राज्यशासन या मुद्द्यावर केंद्र शासनाकडे कशा पद्धतीने पाठपुरावा करतात यावर या प्रस्तावीत रेल्वे मार्गाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. या व्यतिरिक्त पुसद-वाशिम-मेहकर-चिखली-बुलडाणा-मेहकर असाही रेल्वे मार्ग प्रादेशिक योजनेत प्रस्तावीत केला गेला आहे.
१७५ किलोमीटरचा फेरा वाचणार
हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्यास पुण्याला जाण्यासाठी वर्तमानस्थितीत विदर्भातील नागरिकांना पडणारा १७५ किलोमीटरचा फेरा वाचण्यास मदत होईल. सोबतच औरंबागाद येथील नागरिकांनाही रेल्वे मार्गे जाण्यासाठी मनमाडला उलटा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या मार्गासाठी रेटा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे नागपूर-मुंबई या मध्य रेल्वेच्या मार्गावर सध्या मोठा ताण पडत आहे. तो पाहता मालगाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक टाकण्याची तयारीही दर्शवली जात आहे. त्यामुळे मुंबईसाठी पर्यायी मार्ग म्हणून हा मार्ग विकसीत होऊ शकतो. सोबतच विदर्भ पंढरी शेगाव आणि पुणे जोडण्यासोबतच लोहमार्गापासून वंचित असलेल्या बुलडाण्याच्या जिल्हा मुख्यालयालाही त्याच्याशी जोडणे शक्य होईल, असा विचार प्रादेशिक योजना बनविताना प्रादेशिक नियोजन मंडळाने केल्याचे वरकरणी दिसत आहे.
ट्रान्सपोर्टचाही अनुशेष
विदर्भाचा सिंचनासोबतच अन्य क्षेत्रातील जसा अनुशेष आहे तसा तो रस्ते आणि लोहमार्गाच्या बाबतीतही आहे. त्यामुळे असे नवीन मार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात आणून हा अनुशेषही दुर करण्यास मदत होईल. भविष्यात खामगाव जिल्हा निर्मिती झाल्यास रेल्वे ट्रॅकपासून वंचित असलेला विदर्भातील एक असा बुलडाणा जिल्हा ठरू शकतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित असलेल्या शेगाव-पुणे रेल्वे मार्गासाठी रेटा वाढविण्याची अपेक्षा आहे.