- नीलेश जोशी
बुलडाणा: चालू वर्षाच्या प्रारंभी तयार करण्यात आलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या प्रादेशिक योजनेतंर्गत सहा पालिका आणि दोन नगर पंचायतीमधील झालर क्षेत्र विकासाच्या दृष्टीने प्रस्तावीत जमीन वापराचे नकाशे तयार करण्यात आले असून या नकाशांवर १७ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. त्यासाठी पाच सदस्यीय समितीही गठीत करण्यात आली असून महिना अखेर हे नकाशे अंतिम करून तसा अहवाल राज्य शासनास पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील पाच ते दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ११ गावांच्या विकास केंद्रांचेही नकाशे पूर्णत्वास गेले असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सुचना मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्याचा पुढील २० वर्षातील संभाव्य विकास, लोकसंख्येतील वाढ, औद्योगिकीरण, नागरी निवास, विद्यमान जमीन वापर याचा विचार करून प्रादेशिक योजना आणि विकास केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्याची प्रादेशिक विकास योजना यापूर्वीच तयार झाली आहे. त्यानुषंगाने प्रादेशिक योजनेतंर्गत प्रादेशिक विकास केंद्र व झालर क्षेत्रांत समाविष्ट गावांचे प्रस्तावित जमीन वापर नकाशे तयार करण्याचे काम पूर्णत्वास केले असून हे नकाशे पुनश्च: प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यासंदर्भात नागरिकांच्या काही सुचना तथा आक्षेप असल्यास ते नोंदविण्याबाबतही सुचीत करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी हे नियोजन प्राधिकरण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातीलमहसूल विभागात सदर मीन वापराचे नकाशे अवलोकनार्थ उपलब्ध असून तबाबत आक्षेप असल्यास ते १२ डिसेंबरर्पंत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी स्पष्ट केले आहे. बुलडाणा, खामगाव, मलकापूर, मोताळा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, चिखली या आठ शहरलगत असलेल्या २८ गाव परिसराचा विशिष्ट मीटरच्या मर्यादेत झालर क्षेत्रात समावेश आहे. त्यामुळे १७ डिसेंबरला सुनावणी झाल्यानंतर राज्यस्तरावर त्यासंदर्भातील प्रस्ताव जावून त्यास मान्यता मिळाल्यास या आठ शहरालगतच्या झालर क्षेत्रातील विकास कामे व बांधकामे निर्धाेक होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानुषंगाने या हरकती व आक्षेप मागविण्यात आले असून गठीत समितीच्या माध्यमातून हे आक्षेप निकाली काढण्यात येतील. या समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असून सचिव म्हणून प्रादेशिक नियोजन मंडळाचे सदस्य तथा नगर रचना अकोला येथील सहाय्यक संचालक, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि बुलडाणा पालिकेचे मुख्याधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
या भागाचा झालर क्षेत्रात समावेश
बुलडाणा शहरालगतच्या सागवण, सुंदरखेड, येळगाव, माळविहीर, जांभरूण या गावांचा झालर क्षेत्रामध्ये समावेश आहे. खामगाव शहरालगतच्या खामगाव ग्रामीण, घाटपुरी, सुटाला बुद्रूक, सुटाळा खुर्द, वाडी, जनुना, सजनपुरी (पालका हद्दीबाहेरील), सारोळा शेलगाव उजाड (ता. शेगाव), मलकापूर परिसरातील मलकापूर ग्रामीण, गाडेगाव, वाकोडी, रास्तापूर, मोताळा परिसरातील बोराखेडी व सांगळद, देऊळगाव राजा लगतच्या पिंपळनेर, अंभोरा, कुंभारी, संग्रामपूरलगतच्या तामगाव, मेहकर शहरालगतच्या मेहकर ग्रामीण, फैजलपूर, काबरा आणि चिखली शहरालगतच्या चिखली ग्रामीण आणि शेलूदचा झालर क्षेत्रातंर्गत समावेश झालेला आहे.
विकास केंद्रामध्ये या गावांचा समावेश
विकास केंद्रातंर्गत धाड, देऊळघाट, पिंपळगाव राजा, सोनाळा, संग्रामपूर, पिंपळगाव काळे, वडनेर, धामणगाव बढे, अमडापूर, देऊळगाव मही, डोणगाव आणि साखरखेर्डा गावाचा समावेश आहे. या गावामध्ये आगामी २० वर्षात होणारी वाढ पाहता झोन प्लॅननुसार रहिवास क्षेत्र आणि रस्ते तयार करण्याचे काम प्रस्तावीत करण्यात आले आहे. येथे पायाभूत सुविधा देण्यासोबतच स्थानिक पातळीवरच नागरिकांच्या गरजा पूर्ण कशा होतील हा दृष्टीकोण ठेवण्यात आला आहे. शैक्षणिक, आर्थिक, शेती, आरोग्य कायदा व सुव्यवस्था, बँकिंग सुविधांचाही यात समावेश करण्यात आला आहे. अशा सुविधा या पैकी काही ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांचा विस्तारही योजनेच्या अनुषंगाने केल्या जाणार आहे. त्यामुळे १७ डिसेंबरला आक्षेप, हरकतीवर होणार्या सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.