सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये सिंदखेड लपाली गावाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळविला होता. समृद्ध गावं स्पर्धेत सुद्धा हे गावं विविध निकषावर चांगले काम करीत आहे. स्पर्ध्येमधील जलव्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, गावकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, वृक्ष संगोपन, गवताचे संरक्षीत कुरण क्षेत्र तयार करणे व मातीचे आरोग्य सुधारणे या सहा स्तंभावर गावाची नियोजनपूर्वक वाटचाल सुरू आहे.
यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम, ग्राम विकास अधिकारी राजेंद्र वैराळकर, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक ब्रह्मदेव गिऱ्हे यांच्यासह सिंदखेडच्या सरपंच सीमा कदम व ग्रामपंचायत पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
स्पर्धेतील गावकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, या घटकावर गावातील जलमित्र व शेतकरी परिश्रम करीत आहेत. गावातील जलमित्र राजू तायडे, ज्ञानेश्वर बावणे व रवींद्र कोठाळे या तिघांनी गावात कुक्कूट पालन व दुग्धव्यवसायाला सुरवात केली. त्यामध्ये चांगल यश मिळाले असून, इतरांसाठी हा उपक्रम आदर्श ठरत आहे.