धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई ही फक्त निष्पाप नागरिकांसाठीच आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून प्रशासन व राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. शहरातली जनता चौकात दरवर्षी शेकडो वर्षांची परंपरा असलेला, हिंदू धर्मियांचा होळी सण गुण्यागोविंदाने होळी दहन करून साजरा करण्यात येतो; मात्र कोरोना संसर्गाचा वाढत्या प्रसारामुळे प्रशासनाने अंशतः लॉकडाऊनची घोषणा करून विविध सण, उत्सव साजरे करण्यावर नियम व अटींद्वारे निर्बंध लादले आहेत. कोरोना नियमांना अधीन राहूनच नागरिकांनी जनता चौकात होळी दहन करण्यासाठी सर्वतोपरी तयारी करून ठेवली होती. कुठेही गर्दी, गोंधळ न करता प्रशासनाला सहकार्य करत फक्त होलिका दहन करून कमी उपस्थितीत हा सण साजरा होणार होता; मात्र बुलडाणा शहर पोलीस प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता हिंदू धार्मियांच्या भावनांचा अनादर करत जनता चौकात सायंकाळी धाड टाकल्यागत कोणतीही पूर्व सूचना न देता, काहीही सबब एकूण न घेता होळी दहनासाठी नागरिकांनी श्रद्धाभावाने जमा केलेली लाकडे, गोवऱ्या, पूजा साहित्य जमा करून त्यांच्या गाडीत उचलून नेले व विधी उद्ध्वस्त करून धार्मिक भावनांचा मोठा अवमान प्रशासनाने केलेला आहे. त्यामुळे राज्यसरकार व स्थानिक प्रशासनाचा भाजपाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. कुठलीही पूर्व सूचना न देता पोलीस प्रशासनाने कारवाई करून ज्या पद्धतीने धार्मिक भावना दुखावल्या त्याप्रकरणी पोलीस प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा भाजपाच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
होळी दहन थांबविणाऱ्या प्रशासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:35 AM