जानेेेफळ : पत्रकारांशी गैरवर्तणूक करीत मोबाईल हिसकावून मारहाण करणाऱ्या धाड पोलीस स्टेशनचे पीएसआय सागर पेंढारकर व पोलीस कर्मचारी डिगांबर कपाटे यांना निलंबित करुन त्यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जानेफळ येथील पत्रकारांच्या वतीने पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
एका घटनेच्या बातमीकरिता माहिती संकलनासाठी चांडोळ येथील गजानन मरमट,शेख मजहर, दीपक जाधव,शेख नदिम असे चौघे पत्रकार गेले असता पीएसआय सागर पेंढारकर व पोलीस कर्मचारी डिगांबर कपाटे यांनी कुठलाही विचार न करता उपरोक्त पत्रकारांचे मोबाईल हिसकावून फेकून दिले तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत धमक्या दिल्या़ त्यामुळे आम्ही या घटनेचा निषेध करीत असून या घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर येथील पत्रकार सैय्यद महेबूब, गणेश सवडतकर, सैय्यद जाबीर, विष्णू वाकळे, विजय केदारे, विशाल फितवे, सचिन वाळके, रामेश्वर शेवाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.