मलकापूर (बुलढाणा): सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी रेल्वे रोखण्याचा इशारा दिला होता. बुलढाणा पोलिसांनी तुपकर यांना अटक केली. त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर व कार्यकर्त्यांनी १९ जानेवारी रोजी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ४३ जणांना ताब्यात घेतले. रविकांत तुपकर यांनी रेल्वे रोखो आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर व कार्यकर्ते मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यासाठी दाखल झाले.
मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना मलकापूर रेल्वे स्टेशनच्या गेटवर अडवले. आंदोलन करण्यापासून पोलिसांनी रोखल्यानंतर कार्यकर्त्यांनी रेल्वे गेटवरच घोषणाबाजी सुरू केली. यावेळी मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख श्याम अवथळे, जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, अमोल राऊत, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, गजानन पा. भोपळे, सचिन शिंगोटे, भागवत धोरण, दत्तात्रय जेऊघाले, वैभव आखाडे, रामेश्वर अंभोरे, सुनील मिसाळ, विनोद मिसाळ, समाधान भातुरकार, सुधाकर तायडे, उमेश राजपूत, गजानन कुटे, गजानन पंडित, गजानन घुबे, अरुण नेमाने, अरुण पन्हाळकर, संतोष शेळके यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.