नीलेश जोशी, बुलढाणा, मेहकर: संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेच्या इजिप्त येथे होऊ घातलेल्या सिम्युलेशन मॉडेल परिषदेसाठी भारताची राजदूत म्हणून मेहकर येथील अभियंता व हवामान बदल अभ्यासक सोनाली श्याम झोळ हिची निवड झाली आहे.
हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, हवामान कृतीसाठी आर्थिक संसाधने एकत्र करणे, हवामान बदलांच्या परिणामांशी जुळवून घेणे आणि अशा बदलांच्या आव्हानांना तोंड देणे याविषयी ही जागतिक परिषद इजिप्त येथे होणार आहे. गेल्या वर्षीच्या परिषदेतही सोनाली हिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. सिम्युलेशन मॉडेल परिषद यावर्षी लीग ऑफ अरब स्टेट्सच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे.
हवामान संकटांचा सामना करणे, पॅरिस करारात नमूद उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य व समन्वय वाढविण्यात सीओपी -२८ परिषद महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. प्रदूषण जगासाठी मोठे संकट आहे. त्यासाठी या परिषदेच्या अनुषंगिक कार्यात युवकांचा मोठा सहभाग आहे. प्रदूषण, हवामान बदल - जागतिक स्थिती, दिशा आणि उपाय या विषयावर सोनाली झोळ भारताची राजदूत म्हणून आपली मते मांडणार आहे.
सोनाली हिचे वडील श्याम झोळ सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी होते. तिचे प्राथमिक शिक्षण मेहकर येथे झाले. अमरावती विद्यापीठाच्या सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने अभियांत्रिकी पदवी घेतली. आकुर्डी पुणे येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. इस्रोमध्ये सर्टिफिकेशन कोर्स पूर्ण केला. जी-२० परिषदेतही तिने भारताची प्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय कार्य केले होते. आता जागतिक हवामान बदल परिषदेच्या इजिप्त सिम्युलेशन मॉडेल परिषदेसाठी भारताची राजदूत म्हणून सोनाली हिची झालेली निवड बुलढाणा जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
ग्रीनसिटी देशाच्या पंचवार्षिक योजनांचा भाग व्हायला हवी. ज्यामध्ये कार्बन डायॉक्साईड व इतर घटक जे हवेचा दर्जा, इंडेक्सवर परिणाम करतात त्यावर प्रतिबंध आणायला हवा. पायाभूत सुविधा निर्माण करतांना जमिनीचे भूस्खलन होणार नाही याची गांभीर्याने काळजी घ्यायला हवी. देशाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने त्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत.-सोनाली श्याम झोळ, भारतीय राजदूत , ईजिप्त सिम्युलेशन मॉडेल परिषद