मोताळा : येथील पंतप्रधान आवास योजनेतील २०१९-२० मधील घरकूल लाभार्थ्यांना थकीत अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी लाभार्थ्यांनी मंगळवारी बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.
मोताळा नगरपंचायत अंतर्गत शहरातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २०१९-२०२० मध्ये घरकुलाची मंजुरात मिळाली आहे. मात्र अद्याप यातील काही लाभार्थ्यांना अनुदानाचा ४० हजार रुपयांचा एकच टप्पा तर काहींना दोन टप्प्यातील अनुदान मिळाले असून, उर्वरित अनुदान रखडलेले आहे. काही लाभार्थ्यांनी कर्ज व उसनवारी करून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. तर, काही जण अनुदानाअभावी बांधकाम पूर्ण करू शकले नाही. अर्धवट बांधकाम झाल्याने त्यांचे कुटुंब उघडण्यावर आले आहे. लाभार्थ्यांनी सर्व नियमांची पूर्तता करून बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र अनुदान रखडल्याने लाभार्थी अडचणीत आले आहेत. अनेक जण कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. तरी, संबंधित लाभार्थ्यांना थकीत अनुदान तातडीने वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर राजेश गोंड, अजयसिंह हंसकर, गौतम गवई, राजेश पुरी, सुशील जैन, सुरेश तायडे, शेख आसिफ, मोहन वाघ, विजय वासिमकर, सुरेश क्षीरसागर, योगेश खंडे, योगेश डांगे, देवीदास काटे, संजय लवंगे, सुनील डोबाळे, अजय मिरगे, साहेबराव पैसोळे, मनोहर गोंड, भगवान पडोळकर, समाधान घडेकर, राजेंद्र एंडोले, दिलीप बोडखे, शब्बीर बेग, सय्यद रफिक आदींची स्वाक्षरी आहे.