रक्तदानासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा
बुलडाणा : वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे़
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे
दुसरबीड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात मधल्या काळात मिनी लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, व्यावसायिक तथा ग्राहकांकडून अद्यापही शारीरिक अंतराचे पालन केले जात नाही.
विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर ‘वॉच’
सिंदखेड राजा : संचारबंदी असताना नाहक रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांचा वॉच आहे. वाहनचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
स्मशानभूमी दुरुस्त करण्याची मागणी
देऊळगाव राजा : तालुक्यातील अनेक गावांतील स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही गावांमध्ये तर स्मशानभूमीच नसल्याचे चित्र आहे. स्मशानभूमी दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
धुळीमुळे पिकांचे नुकसान
धाड : परिसरात गत काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरून अवजड वाहने जात असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ही धूळ रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकांवर बसत असल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे़
६६९ लाभार्थ्यांना व्याज परतावा
बुलडाणा : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत स्वयंरोजगार उभा करण्यासाठी विविध कर्ज वितरण योजना अमलात आणण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना यांचा समावेश आहे. या योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत ६६९ लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झालेला आहे, तसेच आतापर्यंत ७७१ लाभार्थ्यांचे बँकेने कर्ज प्रकरण मंजूर केले आहे.
नेटवर्क राहत नसल्याने ग्राहक झाले त्रस्त
धामणगाव धाड : परिसरात सर्वच मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क राहत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. वारंवार काॅल मध्येच बंद हाेत असल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जिओचे नेटवर्कच गायब झाल्याचे चित्र आहे.
‘बेबी केअर किट’ची प्रतीक्षा
बुलडाणा : प्रथम प्रसूती झालेल्या महिलांना ‘बेबी केअर किट’चे वाटप करण्याचा उपक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राबविण्यात येतो; परंतु सध्या अंगणवाडी केंद्रामध्ये महिलांना ‘बेबी केअर किट’ची प्रतीक्षा आहे.
उद्यान परिसरात वाढला कचरा
बुलडाणा : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा व धूळ साचत आहे. या कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. येथील उद्यान परिसरातही प्रचंड कचरा साचून राहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ग्रामीण भागात पाणीटंचाई
बुलडाणा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून, दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
डाेणगाव ते शेलगाव रस्त्याची दुरुस्ती करा
डोणगाव : डाेणगाव ते शेलगाव व शेलगाव ते इश्वी या रस्त्यांची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.
पद्मावती धरणात मुबलक जलसाठा
धामणगाव धाड : येथून जवळच असलेल्या पद्मावती धरणात उन्हाळ्यातही मुबलक जलसाठा असल्याने परिसरातील ३२ गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे, तसेच रबी पिकांसह उन्हाळी पिकांनाही धरणाचे पाणी उपलब्ध हाेणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.