लोकमत न्यूज नेटवर्कखामगांव : नगरपरिषदेचा कारभार ढेपाळला असून शहरातील सुलभ शौचालये कूलपबंद असल्याचे दिसून येते. शौचालयांचे बांधकाम नियमबाह्य झाले असून या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी न.प.विरोधी पक्षनेता अर्चना टाले यांनी केली आहे.सुलभ शौचालयाचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर संबंधीत कंत्राटदाराने सुलभ शौचालय नगर परिषदेला हस्तांतरीत केलेले नसतांना सुध्दा मोठा गाजावाजा करुन २४ आॅगस्ट रोजी या सुलभ शौचालयाचे जनप्रतिनिधीच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. परंतू लोकार्पणानंतर त्या सुलभ शौचालयांना कुलुप लावण्यात आले. यामुळे नागरिक उघडयावर लघुशंका करीत असुन यामुळे महिलांची कुचंबना होत आहे.जनतेच्या विकासाच्या गप्पा मारुन स्वत:चाच विकास साधणा-या न.प.मधील भाजपा सत्ताधा-यांची खरी प्रवृत्ती या मधुन पुन्हा एकदा जनतेसमोर येत आहे. १४ व्या वित्त आयोगांतर्गत स्वच्छता गृह बांधण्यात आली आहेत. नगर परिषद इमारती कार्यालयासमोर, फरशी येथील हनुमान मंदिरासमोर तसेच शहर पो.स्टे.समोरील गांधी उद्यानासमोर या तीन ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे. राज्य महामार्ग विस्तारी करणाचे काम सुरु असतांना, महामार्गावर रस्त्याच्या मध्यापासुन ३७ मिटर अंतरापर्यंत बांधकाम करता येत नाही असा स्पष्ट उल्लेख करीत सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्याधिकारी यांना पत्र दिले होते. तरी काम थांबवले नाही. यासंदर्भात मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.
खामगावात सुलभ शौचालये कुलूपबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 3:06 PM