लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या भाजीपाल्यासोबत डाळही अवाक्याबाहेर गेली आहे. ही दरवाढ घराघरात चिंतेचा विषय बनलेला आहे.
जेवणात मसूर दाळीचा वापर करून भूक भागविली जात आहे. पावसाळा सुरू असल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक कमी आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. तसेच आगामी सणांचा काळ पाहता डाळीचे दर आणखी भडकणार असल्याचे संकेत आहेत. गत काही दिवसांपासून तूर डाळीचे दर चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
...म्हणून डाळ महागली!
वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि परराज्यातून माल आणण्यात जाणवणाऱ्या अडचणी यामुळे आपोआपच किराणा मालाच्या दरात वाढ झाली होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
खरिपात पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे तूर, सोयाबीनसह इतर डाळवर्गीय पिकांना चांगला दर मिळाला. परिणामी, डाळींच्या किमती वाढल्या आहे.
...म्हणून भाजीपाला कडाडला!
कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी हीच स्थिती परत येऊ नये, याकरिता कमी प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली. त्यात आता पावसाळा सुरू आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवकही कमी आहे.
सर्वसामान्यांचे हाल
तीन-चार महिन्यांपासून तेलाचे दर वाढत आहेत. आता डाळीचे दरातही वाढ होत आहे. त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. पालेभाज्याच्या दरातही काही अंशी वाढ झाली आहे.
- संध्या इंगळे
खाद्यतेलाच्या दरात वाढ होत आहे. तुरीचा दर वाढला असल्याने तूर डाळीचा दर वाढला आहे. तूर डाळ १०४ रुपये किलोने विक्री होत आहे. इतर डाळीच्या किमतीतही वाढ झाली आहे.
- भारती वानखडे