बुलडाणा - जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यातशहीद झालेल्या 38 जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानदेखील शहीद झाले आहेत. मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह दीक्षित (राजपूत) आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड हे दोन जवान शहीद झाले आहेत. हे दोघंही 10 फेब्रुवारीला सुटी संपल्यानंतर कर्तव्यावर रूजू झाले होते. 46 वर्षीय संजयसिंह भिकमसिंह दीक्षित यांचे शिक्षण हे मलकापूर शहरातच झाले आहे. 1996 मध्ये ते सीआरपीएफध्ये भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई जिजाबाई, पत्नी सुष्मा, मुले जयसिंह आणि शुभमसिंह असा परिवार आहे. त्यांची पत्नी सध्या नागपूर येथील सीआरपीएफच्या कॉर्टरमध्ये राहत असल्याची माहिती आहे. नातेवाईक त्यांना आणण्यासाठी नागपूरला रवाना झाले असल्याचेही काही निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान, लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गावानजीक असलेल्या गोवर्धन नगर येथील नितीन शिाजी राठोड (३६) हे देखील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ते शहीद झाल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे.
दरम्यान, मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह दीक्षित यांचे पार्थिव 15 फेब्रुवारीला रात्री 9 वाजता दिल्ली येथून विमानाने नागपूर येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर तेथून ते मलकापू येथे आणण्या येईल. मलकापूर येथे 16 फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.यासंदर्भात अद्याप जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. लोणार तहसीलदार गोवर्धन नगरमध्ये लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गावानजीक असलेल्या गोवर्धन नगर येथील शहीद जवान नितीन शिवाजी राठोड यांच्या निवासस्थानी लोणारचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, शहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव 16 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजेच्या सुमारास गोवर्धन नगरमध्ये आणण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. प्रसंगी त्यात काहीसा बदलही होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.