खामगाव : शेतातील कुंपनावरुन झालेल्या वादात सख्ख्या चुलत भावास मारहाण केल्याप्रकरणी आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने चारही आरोपींना प्रत्येकी एक महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली. सदरचा निकाल खामगाव न्यायालयाने आज २२ जुलै रोजी दिला असून आरोपी हे लाखनवाडा येथील रहिवासी आहेत. याबाबत हकीकत अशी की, तालुक्यातील लाखनवाडा बु. येथील श्रीकृष्ण यशवंत पांढरे हे १७ एप्रिल २00३ रोजी त्यांच्या शेतात जळालेल्या मोटारीचे काम करीत असताना त्यांना शे.सलीम व आत्माराम सोनाटकर हे मदत करीत होते. दरम्यान श्रीकृष्ण पांढरे यांच्या शेतातील काट्याचे कुंपन सौ.नंदा वसंत पांढरे ही काढीत होती. तेव्हा तीला कुंपन काढण्यास श्रीकृष्णने मनाई केली असता सौ.नंदा ही घरी गेली व तीने वसंत तुकाराम पांढरे, अनंता वसंत पांढरे, गोपाल वसंत पांढरे यांना शेतात घेऊन आली. या तिघांनी कुर्हाड, कोपळी व काट्यांनी श्रीकृष्णला मारहाण केली तर सौ.नंदा हिनेही चापटांनी मारहाण केली, अशा आशयाची तक्रार श्रीकृष्ण पांढरे यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनला दिली होती. तेव्हा हिवरखेड पोलिसांनी उपरोक्त चारही जणांविरुध्द अपराध नंबर ३९/0३, कलम ४४७, ३२५,३२३,३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाची आज २२ जुलै रोजी खामगाव न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले असता चारही आरोपींविरुध्द गुन्हा सिध्द झाला. त्यामुळे आरोपींना कलम ४४७ मध्ये प्रत्येकी ५00 रुपये दंड, कलम ३२३ मध्ये प्रत्येकी १ महिन्याची साधी शिक्षा, कलम ३२५ मध्ये प्रत्येकी १ महिना शिक्षा व प्रत्येकी ५00 रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवसाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी श्रीकृष्णला ३ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. सदरचा निकाल कोर्ट नं.३ चे न्यायाधीश जी.आर.ढेपे यांनी दिला. सरकारी पक्षाच्या वतीने अँड.अजय इंगळे यांनी काम पाहिले.
मारहाणप्रकरणी चौघांना शिक्षा
By admin | Published: July 22, 2014 11:38 PM