लोणार : पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर यांचे १०१ दगडी स्तंभाच्या अन्नछत्राचे लवकरच सुशाेभीकरण हाेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी धर्मशाळेचे संवर्धन करण्यासाठी दाेन काेटी रुपयांचा निधी दिला आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला होता. अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारे १०१ दगडी स्तंभाचे लोणार येथील अन्नछत्र आज भकास होत चालले आहे. पूर्वी येथे यात्रेकरूंना मोफत भोजन दिले जाई.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मल्हारराव होळकरांच्या सून होत. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांच्या स्मरणार्थ इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे. त्यांनी राज्याबाहेरही अनेक मंदिरांचे व इतर अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यापैकी द्वारका, गुजरात, काशीच्या पूर्वेस गंगातीरावर वाराणसी, उज्जैन, नाशिक व परळी वैद्यनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. असेच अन्नछत्र जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर येथे आहे. अहिल्यादेवी होळकर अन्नछत्र नावाने प्रसिद्ध असलेल्या याठिकाणी पूर्वी यात्रेकरूंना मोफत भोजन दिले जाई असे सांगण्यात येते. त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारे १०१ दगडी स्तंभाचे लोणार येथील अहिल्यादेवी होळकर अन्नछत्र वास्तू आहे. प्रशासनाच्या व नागरिकांच्या दुर्लक्षितपणामुळे अहिल्यादेवी होळकर अन्नछत्राचे अनेक दगडी खांब पडलेले दिसून दिसून येतात. अशा ऐतिहासिक वास्तूला वसाहतीचा विळखा बसत असल्यामुळे ही वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ फेब्रुवारी रोजी लोणार सरोवर संवर्धन व विकास आराखड्यासंदर्भातील बैठकीत २०२१–२२ करिता दिलेले विभागनिहाय कामांचे उद्दिष्ट व त्याच्या नियोजनामध्ये धर्मशाळा संवर्धनासाठी २ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर अन्नछत्राचे सुशोभीकरण होऊन जतन होण्याचा मार्ग सुकर झाला.