लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या वतीने जळगावात दहा दिवसांपासून कापूस खरेदी सुरू झाली असून १६ डिसेंबर पर्यंत १४ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली होती. शासनाच्या हमी भावाप्रमाणे ५७२५ रुपये प्रति क्विंटल या दराने सध्या कापूस खरेदी सुरू असून सुरुवातीला कापूस खरेदीचा वेग कमी होता. आता मात्र दोन जिनिंगमध्ये दररोज शंभर गाड्यांचे मोजमाप होऊन २५०० ते ३००० हजार क्विंटलपर्यंत कापूस खरेदी सुरू आहे. पणन महासंघाकडे कर्मचाऱ्यांची फार कमतरता असल्याने श्री कोटेक्स व श्री सुपो या दोन्ही जिनिंगवर एकच ग्रेडर यावर्षी काम पाहत आहे. मागील वर्षी दोन जिनिंगवर २ ग्रेडर होते. यावर्षी सीनियर ग्रेडर तथा संकलन केंद्र प्रमुख म्हणून पुरुषोत्तम गावंडे हे काम सांभाळत आहे. एकच ग्रेडर असूनही सुव्यवस्थित नियोजनामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी नाहीत. मागील वर्षी जळगाव कापूस संकलन केंद्रावर विक्रमी दीड लाख क्विंटलची कापूस खरेदी झाली होती.यावर्षी किती कापूस खरेदी होतो यावर उत्पादनाची दिशा निश्चित होणार आहे. सततचा पाऊस व गुलाबी बोंडअळी यामुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. प्रत्यक्ष कापूस खरेदी नंतर कपाशीच्या उत्पादनात किती घट झाली याचे वास्तव चित्र समोर येईल. दुसरे असे की पणन महासंघाने फार उशिरा म्हणजे डिसेंबरमध्ये कापूस खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकला. व्यापाऱ्यांनी हा कापूस गुजरातकडे रवाना करून तेथील जिनिंग मालकांना दिला. त्यामुळे ३० ते ४० टक्के कापूस हा गुजरातला रवाना झाल्याचा अंदाज आहे. तसेच स्थानिक जिनिंग मालकांनी सुद्धा कापूस खरेदीला सुरुवात केली होती. त्यांनी सात ते आठ हजार क्विंटल कापूस खरेदी केला असावा.
संग्रामपूर येथे संकलन केंद्राचा अभाव जिल्ह्यात घाटाखाली सहा तालुके आहे. त्यापैकी पाच तालुक्यात पणन महासंघ व सीसीआयची कापूस संकलन केंद्रे आहेत. परंतु संग्रामपूर तालुक्यात कापूस संकलन केंद्र नाही. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील कापूस उत्पादकांना जळगाव जामोद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विक्रीकरिता नोंद करावी लागते आणि जळगाव येथील श्री सुपो जिनिंग व श्री कोटेक्स जिनिंग येथे आपला कापूस विक्री करीता आणावा लागतो. मलकापूर, नांदुरा, खामगाव येथे सीसीआयची कापूस खरेदी आहे, तर जळगाव जामोद, शेगाव येथे पणन महासंघाच्या वतीने कापूस खरेदी सुरू आहे. सीसीआयने नोव्हेंबर महिन्यात प्रथम मलकापूर, नांदुरा येथे कापूस खरेदी सुरू केली नंतर खामगाव केंद्र ओपन केले. पणन महासंघाची कापूस खरेदी प्रक्रिया मात्र डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली.