लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : विद्यमान जि.प. सदस्याकडून सुरू करण्यात आलेले दारू विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या अखत्यारीतील महिला सरसावल्या आहेत. यासाठी महिलांनी गुरुवारी अस्तित्व संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात एसडीओ कार्यालयात ठाण मांडून हरतालिकेची पूजा केल्यामुळे एकच खळबळ उडाली.यासंदर्भात मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत अखत्यारीतील बन्सीलाल नगर, नळगंगा नगर, चिंतामणी नगर, चैतन्यवाडी व हनुमान नगरातील महिलांनी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की चिंतामणी नगरीत जनता कॉलेज ते बन्सीलाल नगर रस्त्यावर जि.प. सदस्य केदार एकडे यांनी कुठल्याही परवानग्या न घेता ‘कल्याण’ नावाने दारू विक्रीचे दुकान सुरू केले आहे. हा रस्ता रहदारीचा असून, शाळकरी विद्यार्थ्यांना प्रामुख्याने मुली व महिलांना याचा त्रास होत आहे. बन्सीलाल नगरातील हनुमान मंदिरात जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात ना-हरकतीविषयी ग्रामपंचायतकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला.२४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास सदर दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी मलकापूर ग्रामीणच्या महिला रस्त्यावर उतरल्या. गुरुवारी महिलांचा हरतालिका हा सण असताना तो घरी साजरा न करता संतप्त महिलांनी चक्क एसडीओ कार्यालय परिसरातच हरतालिकेची पूजा मांडली. यावेळी दारूबंदीच्या घोषणांसह भजनेही महिलांनी गायली.प्रस्तुत निवेदनावर अलका बगडे, सपना नारखेडे, प्रतिमा राजपूत, कविता गव्हाड, प्रतिभा ठाकूर, विद्या अढाव, रूपाली धारस्कर, अर्चना राजपूत, वर्षा चौधरी, जयश्री उद्गे, सविता राजपूत, अनिता राजपूत, प्रमिला पाटील, आशा मंडवाले, सविता जोशी, मालती भारंबे, शोभा कोलते, ममता सुरडकर, प्रमिला तुले, निलीमा वराडे, करुणा भोंबे, मनीषा वराडे, प्रीती चौधरी, रेखा नाफडे, सुनीता सावळे, कल्पना खडसने, जयश्री चोपडे, मनीषा मुंधोकार आदी महिलांच्या स्वाक्षरी आहेत. दारू दुकान बंदीसाठी महिलांनी केलेल्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दारूबंदीचा चेंडू जिल्हाधिकार्यांच्या कोर्टात दारू दुकान बंद करण्यासाठी अस्तित्व संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात महिला एसडीओ कार्यालयात ठाण मांडून होत्या. तब्बल सहा तासांनंतर आंदोलनकर्त्या महिलांना उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांनी चर्चेसाठी पाचारण केले. याविषयीची लेखी माहिती वरिष्ठांना दिल्याचे सांगून २८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी याविषयी निर्णय घेतील, असे त्यांनी आश्वस्त केले. यावेळी डीवायएसपी गिरीश बोबडे, पोलीस निरीक्षक अंबादास हिवाळे, नायब तहसीलदार विजय पाटील हजर होते. आंदोलन चिघळू नये, याकरिता दंगा काबू पथकही तैनात करण्यात आले होते.