तालुक्यात झालेल्या ग्रामपंचयत निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, असा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. ग्रामपंचायतींत सरपंच आमचा होईल, असा दावाही विविध पक्षांकडून करण्यात येत आहे. १८ जानेवारी राेजी जाहीर झालेल्या निकालात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे.
मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे ३९ ग्रामपंचायतींकरिता १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. या ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी मेहकर येथील तहसील कार्यालय येथे जाहीर करण्यात आला. यावेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मेहकर तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींकरिता ७४९ उमेदवार ३१३ जागेसाठी उभे होते. याकरिता १४२ मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. सोमवारी १४ टेबलवर १४ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल घोषित केला. या निवडणुकीमध्ये मेहकर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या ३९ हजार २७२ पुरुष, तर ३५ हजार ७०२ महिला मतदारांनी मतदान केले. यामध्ये सोमवारी निकाल जाहीर करताच काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवीन उमेदवारांना जनतेने ग्रामपंचायतीमध्ये संधी दिली. यापैकी हिवरा आश्रम येथील भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर यांच्याविरोधात शिवसेनेचे नेते विठ्ठल भाकडे, मनोहर गिर्हे यांनी पॅनल टाकून शिवसेनेने अकरा जागांपैकी सात जागांवर दणदणीत विजय मिळवित ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम केले, तर भाजपाचे संजय वडतकर यांना चार जागेवर समाधान मानावे लागले. देऊळगाव माळी येथील मोठी असलेली ग्रामपंचायत येथे किशोर गाभणे यांनी दणदणीत विजय मिळवीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. लोणी गवळी येथे माजी सभापती सागर पाटील व केशवराव जागृत यांना समसमान विजय मिळाला असून लोणी गवळी ग्रामपंचायतीची धुरा ही आता अपक्ष व्यक्तीवर अवलंबून आहे. या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत नवीन उमेदवारांना संधी दिल्याने नवीन उमेदवारांना सुवर्णकाळ आला आहे.
विजयावर सर्वांचाच दावा
मेहकर तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणीत पॅनलने वर्चस्व मिळवल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याने त्या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीचाही बोलबाला असल्याचे त्यांच्या प्रक्वताकडून बोलले जात आहे.