धाड : तालुक्यातील मासरूळ मंडलामधील जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या कामावर फलक लावण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामगार सेल तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांनी १२ मे रोजी कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बुलडाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीची पूर्तता न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बुलडाणा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत मोठ्या प्रमाणात रस्ते, इमारती, सिमेंट बांधकाम इत्यादी कामे सुरु आहेत. या कामांवर काही ठिकाणी यांनी उद्घाटन केले, यांची प्रमुख उपस्थिती होती, यांच्या प्रयत्नाने काम मंजूर झाले, असे फलक बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. परंतु, बांधकाम विभागांतर्गत सुरु असलेल्या कामांवर योजनेचे नाव, कामाची अंदाजपत्रक रक्कम, कार्यारंभ आदेश दिनांक, करारनामा क्रमांक, काम पूर्ण करण्याचा दिनांक व संबंधित ठेकेदाराचे नाव इत्यादी माहिती असलेला फलक लावण्याची जबाबदारी ही बांधकाम विभागाची जबाबदारी असतानाही कुठल्याही कामावर फलक लावलेला दिसत नाही. त्याचा विसर या कार्यालयाला पडलेला आहे. कामाचे फलक न लावणे म्हणजे संबंधित कामाची माहिती लपवून ठेवणे व आपल्या मर्जीप्रमाणे काम करणे असा आहे, असा आरोप मनोज दांडगे यांनी केला आहे. बुलडाणा तालुक्यातील मासरूळ मंडलामध्ये सुरु असलेल्या कामांवर कामाशी संबंधित सर्व माहितीसह फलक लावण्यात यावा व या संदर्भातील कार्यवाही तत्काळ करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दांडगे यांनी निवदेनाद्वारे दिला आहे.